मुंबई : कधी मराठी – अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव – राज एकत्र येणार हे मुद्दे घेऊन मागील दोन दशकांपासून राजकारणात खेळ सुरू आहेत. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली त्याला १९ वर्षे पूर्ण झाली. पक्षानं विसाव्या वर्षात पदार्पण केलं. पण हे मुद्दे काही बदलत नाहीत. आलटून पालटून हे तीन मुद्दे पुढे येत असतात. थोडे दिवस भावनिक खेळ रंगतो. पुढे काही होत नाही. कधी उद्धव ठाकरे सुरवात करतात. तर कधी राज ठाकरे बोलतात. मुद्दे तेच असतात पण मांडणी नव्या प्रकारे होत असते. प्रत्येकवेळी प्रसारमाध्यमांमधून तर्कवितर्कांचा खेळ सुरू होतो. पुढचे काही दिवस चर्चेला उधाण येते. नंतर विषय मागे पडतो. आता पुन्हा एकदा उद्धव – राज एकत्र येणार या मुद्यावरुन चर्चा रंगली आहे.
Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार
कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे… पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांना मी घरात बोलवणार नाही! जेव्हा आम्ही म्हणत होतो की उद्योग गुजरातला जातायत, तेव्हा जर साथ दिली असती तर महाराष्ट्राचं सरकार वेगळं दिसलं असतं. आता विरोध करणं आणि पुन्हा तडजोडीचं बोलणं हे चालणार नाही.
दुसरीकडे, महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलले, एकत्र येणं कठीण नाही. फक्त इच्छेचा विषय आहे. मी माझा इगो आड येऊ देत नाही. आणि उद्धवसोबत काम करायला मला हरकत नाही.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या या ताज्या वक्तव्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे. महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याआधी उद्धव – राज एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे.
आरक्षणाचा तिढा आणि रखडल्या निवडणुका
मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. निकालातून राजकीय आरक्षणाबाबत काही निर्देश आले तर महापालिका निवडणुकांचे स्वरुप बदलू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका रखडल्या आहेत. यात प्रामुख्याने महापालिकांच्या निवडणुका आहेत. आरक्षणाचा तिढा सुटला आणि निवडणुकांची घोषणा झाली तर महापालिकांच्या निमित्ताने सर्वच पक्षांची परीक्षा असेल. यामुळे अधूनमधून वेगवेगळे पक्ष नवनवे मुद्दे पुढे करुन जनमताचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतात. ताजी उद्धव – राज एकत्र येण्याची चर्चा ही दोन्ही नेत्यांकडून जनमताचा अंदाज घेण्यासाठीची खेळी असण्याची शक्यता यामुळेच व्यक्त होत आहे.