अंजली पोतदार
आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. तेव्हापासून तिच्यावर अस्तित्वात असलेल्या हवा, पाणी, वनस्पती, प्राणी इत्यादी गोष्टींमध्ये आजपर्यंत बदल होत गेले. काही बदल नैसर्गिक होते, तर काही मानवनिर्मित. पण या बदलांचा पृथ्वीवर आणि त्या अानुषंगाने पर्यावर्णावरही होऊ लागला. हा बदल जसा सजीव सृष्टीवर वाईट परिणाम करू लागला तसा माणूस जागरूक होऊ लागला आणि तो सुसह्य, अनुकूल करण्यास सुरुवात झाली. हे सर्वप्रथम कुठे, कसे सुरू झाले आणि त्याचा जागतिक वसुंधरा दिवसाशी काय संबंध हे आपण पाहूया. १९६०च्या दशकात अमेरिकेला पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जायला लागले. हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेसाठी त्यावेळी काहीही कायदे अस्तित्वात नव्हते. पण प्रदूषण, तर मोठ्या प्रमाणात होते. विस्कॉन्सिनमधील त्या वेळचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरणाचे शिक्षण देण्याचा देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. १९६९ मध्ये नेल्सननी या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समन्वयक म्हणून डेनिस हेस यांची निवड केली. हेसने संपूर्ण अमेरिकेत पृथ्वीदिनाचा प्रचार करण्यासाठी ८५ लोकांचा एक चमू तयार केला आणि २२ एप्रिल १९७० रोजी नेल्सन चे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. संपूर्ण अमेरिकेतील अंदाजे २ कोटी लोक ज्यात विद्यार्थी, पर्यावरणवादी संघटना, शिक्षक, शेतकरी अगदी राजकारणीसुद्धा एकत्र आले होते. त्यांची मागणी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणासाठी ठोस कृती करण्याची होती. या पहिल्या पृथ्वीदिनाच्या यशाने हे दाखवून दिले की सार्वजनिक दबावामुळे पर्यावरणीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण राजकीय कृती होऊ शकते. या पहिल्या पृथ्वी दिनाचा अमेरिकेच्या राजकारणावर खोल परिणाम झाला. पर्यावरण संरक्षण संस्थेची (Environmental Protection Agency) स्थापना झाली आणि प्रमुख पर्यावरणीय कायदे मंजूर करण्यात आले.
१. स्वच्छ हवा कायदा
२. पाण्याची गुणवत्ता सुधारणा कायदा
३. सुरक्षित पेयजल कायदा
४. कीटकनाशन नियंत्रण कायदा
५. संसाधन संवर्धन कायदा
६. व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कायदा
७. खाण नियंत्रण कायदा … यांचा समावेश होता.
१९९० मध्ये पृथ्वीदिन विस्तारला आणि तो एक जागतिक कार्यक्रम बनला. तब्बल १४१ देशातील २० कोटींहून अधिक लोकांनी पृथ्वीदिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. पर्यावरणातील आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण झाली. १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेने ह्याची दखल घेतली. १९९५ मध्ये गेलॉर्ड नेल्सन यांना पृथ्वीदिनाच्या स्थापनेतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. असा हा पृथ्वीदिन २२ एप्रिल २०२५ ला ५५ वर्ष पूर्ण करतोय. दरवर्षी ह्या दिवसाची एक विशेष संकल्पना घोषित केली जाते. यावर्षीची संकल्पना आहे ‘आमची शक्ती, आमचा ग्रह’ पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्याचा हा दिवस. या संकल्पनेद्वारे जगभरातील सर्वाना अक्षय्य ऊर्जेसाठी एकत्र येण्याचे आणि २०३० पर्यंत जागतिक स्तरावर स्वच्छ वीजनिर्मिती तिप्पट करण्याचे आवाहन केले आहे.
अक्षय्य ऊर्जा म्हणजे सूर्य, वारा, पाणी, प्रगत भूऔष्णिक वस्तू आणि कचरा या साऱ्यांपासून मिळवलेली ऊर्जा. यांनाच ऊर्जेचे अपारंपरिक स्रोत असेही म्हणतात. हे स्रोत निसर्गात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतात, तर सौरऊर्जा, जलऊर्जा हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोळसा, लाकूड, पेट्रोल हे पारंपरिक स्रोत आता संपुष्टात येऊ लागले आहेत. यातून ऊर्जा निर्मिती खर्चही खूप असतो. पारंपरिक ऊर्जेच्या वापराने उत्सर्जित सी ओ टू वायू पर्यावरणाचे पर्यायाने सजीवांचेही आरोग्य धोक्यात आणतो. अक्षय्य ऊर्जास्रोत मात्र हरितगृह वायू उत्सर्जन कमी करतात. जीवाश्म इंधन हे हरितगृह वायूंचे प्रमुख उत्सर्जक असल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे महत्त्वाचे कारण आहे. एक जागरूक ग्राहक म्हणून आपण पर्यावरण रक्षणासाठी वसुंधरादिनानिमित्त पुढील गोष्टी नक्कीच करू शकतो. आपले अन्न, कपडे, प्रवास, वीज आणि पाण्याचा वापर, तयार झालेला जैविक आणि प्लास्टिक कचरा या साऱ्याचे पर्यावरणातच शोषण होत असते. त्यामुळे तयार झालेल्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया व त्याचा पुनर्वापर करणे नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करणे शाश्वत जीवनशैलीचा स्वीकार करणे एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर थांबवणे हवामान साक्षरतेचा प्रसार अशा अनेक मार्गांचा स्वतःपुरता जरी अवलंब केला तरी आपला ग्रह ही आपली शक्ती नक्कीच होऊ शकेल अशी खात्री आहे.
Email: [email protected]