या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा
कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार होते तेव्हा हा गुन्हा घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी दबक्या आवाजात चर्चा होती. मग या गुन्ह्याची माहिती नक्कीच माजी आमदार वैभव नाईक यांना होती. मग त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज का उठवला नाही? असा सवाल शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी उपस्थित करून त्यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांना नक्कीच या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट पैसे देत होता की काय असा संशय निर्माण होत आहे.
पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी यामध्ये आमचे जरी कोणी पदाधिकारी असतील तरी त्यांच्यावर कारवाई करावी आणि हा गुन्हा लपवला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी करावी अशी मागणी केली.
चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या खून प्रकरणानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर आरोप केले. या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जो व्हिडिओ प्रसारित केला आहे. तो व्हिडिओ कधीचा आहे हे पडताळणे गरजेचे आहे. ही घटना २०२३ या वर्षांमध्ये झाली त्यावेळी वैभव नाईक आमदार होते ते संविधानिक पदावर कार्यरत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात या गुन्ह्याची दबक्या आवाजात चर्चा होती जर या गुन्ह्याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांच्या पर्यंत आली होती तर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देणे गरजेचे होते तसे न करता ९ एप्रिल २०२५ रोजी प्रकाश बिडवलकर यांच्या मामीने तक्रार दाखल केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी १४ एप्रिल २०२५ रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ प्रसारित केला आणि १६ एप्रिल २५ रोजी पोलीस अधीक्षक यांना शिष्टमंडळाद्वारे जाऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
वैभव नाईक आमदार होते. त्यावेळी घडलेली घटना आणि त्यांना याबाबत असलेली माहिती त्यांनी का लपवली त्यावेळी त्यांच्या पक्षामध्ये सिद्धेश शिरसाट कार्यरत होते. त्यांना संरक्षण देण्यासाठी ही घटना वैभव नाईक यांनी लपवली असावी असा संशय निर्माण होत आहे. त्यासाठी त्यांनी सिद्धेश शिरसाटकडून पैसाही घेतला असेल, यात ही संशय निर्माण होत आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी वैभव नाईक आमदार असताना कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत असताना या प्रकरणातील माणगाव येथील नार्वेकर हा आरोपीत त्यांच्या समवेत असायचा, त्या कबड्डी आयोजनामध्ये त्याचा सहभाग असायचा. तसेच या प्रकरणातील अमोल शिरसाट हा आरोपी वैभव नाईक यांच्यासमवेत नाचताना फोटो आहे. आमदारकीच्या काळामध्ये दारू व्यवसायिकांसह अनैतिक धंद्यांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून पैसे जमा करण्याचा धंदा वैभव नाईक यांचा होता. आता हा धंदा बंद झाल्यामुळे आरोप करीत आहेत. त्यांनी अमली पदार्थ विरोधात एकही पत्रकार परिषद घेतली नाही या अमली पदार्थ विकणाऱ्यांसोबत यांचे लागेबंध आहेत की काय असाही संशय निर्माण होत असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.