मुंबई : मेट्रो ३ ने प्रवास करत असाल तर आज वेळापत्रक पाहूनच प्रवास करा. सकाळी साडेसहाला सुरू होणारी सेवा आज ८:३० च्या सुमारास सुरु झाली आहे. ही मेट्रो सेवा आज रात्री साडेदहापर्यंत सुरू राहणार आहे. त्यानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन मुंबई मेट्रोकडून करण्यात आलं आहे.
शुक्रवार रात्री पश्चिम रेल्वेवर रात्रीचा ब्लॉक; रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो ३ वरील सेवा आज सकाळच्या सुमारास उशिराने सुरु झाली. नेहमी सकाळी साडेसहाला सुरू होणारी सेवा आज ८:३० च्या सुमारास सुरु झाली. ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ (आरे) भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर आता अगदी काही दिवसातच बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा २ अ टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्याच्या संचलनाच्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आणखी एक पाऊल पुढे उचलले आहे.
एमएमआरसीकडून आरे – बीकेसी आणि बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यानच्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. या चाचण्यांसाठी आरे – बीकेसी मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आज (दि १८) रोजी तांत्रिक कारणामुळे मेट्रो-३ च्या सेवा सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पर्यंत उपलब्ध असतील”, अशी एक्स पोस्ट मुंबई मेट्रो ३ च्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आली आहे.