Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखअग्निसुरक्षा एक सामाजिक जबाबदारी

अग्निसुरक्षा एक सामाजिक जबाबदारी

सुरक्षा घोसाळकर

आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी पूजा हा अतिशय महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्यामुळे अग्नीचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे असे मला वाटते; परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही हे वारंवार लागणाऱ्या आगीमुळे उघड होणारे कटू सत्य आहे. आपत्ती समोर सर्व समान असतात. मग ती नैसर्गिक असो किंवा मनुष्य निर्मित असो. सदैव न्याय हक्कासाठी भांडणाऱ्या, आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या नागरिकांना तसेच विकासाची कास धरू पाहणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांना अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन या विषयांबाबत खरोखर गांभीर्य आहे का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकास पडतो. विविध दुर्घटनांमुळे नागरीप्रशासन व लोकनियुक्त सरकार अग्निसुरक्षेबाबत सजग नसल्याचे प्रकर्षाने समोर येते.

या संदर्भात खालील काही मुद्दे उपस्थित होतात.

१. इमारती सभोवतालची मोकळी जागा व परिसर रचना : रहिवासी इमारतीचा भाग व व्यावसायिक दुकाने पूर्णतः वेगळे असावेत. झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी एकमजली वा दुमजली झोपड्यांमध्ये तळमजल्यावर व्यावसायिक दुकाने प्रस्थापित केली जाऊन त्यावरील पोटमाळ्यावर राहण्याच्या गैरसोयीमुळे बरीचशी कुटुंबे वास्तव्य करीत असतात. पुढच्या बाजूला दुकान व पार्टीशन करून मागील बाजूस कुटुंब राहते अशा लोकांना दुकानाच्या मुख्य दरवाजाशिवाय बाहेर जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसतो. तरी मुंबईतील दुकाने व व्यवस्थापने यांची तपासणीची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या लायसन्स डिपार्टमेंटकडून काटेकोरपणे तपासणी करण्याची भूमिका निभावली जाते का? बऱ्याच वेळी बहुमजली इमारतीमध्ये देखील तळमजल्यावर व्यावसायिक दुकाने, पहिल्या दुसऱ्या माळ्यावर वाहने पार्किंग तसेच ऑफीस / दुकाने यांना महानगरपालिका व अग्निशमनदल यांनी परवाने दिलेले पाहावयास मिळतात. रहिवासी इमारतीमध्ये व्यावसायिक आस्थापने, दुकाने व व्यवस्थापनाला परवानगी देताना प्रत्येक इमारातीमध्ये २ स्वतंत्र जिने परस्परविरुद्ध बाजूला असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण इमारतीमध्ये आगीसारखी दुर्घटना घडल्यास इमारतीच्या वरील माळ्यांवरील व्यक्तींना दुसऱ्या जिन्याने सुरक्षित ठिकाणी जाता येणे शक्य होईल. तसेच सामाजिक भान ठेवून इमारतीच्या मोकळ्या जागेमध्ये वाहने अवास्तव पार्क करून ठेऊ नयेत व इमारतीच्या आसपासची, भोवतालची जागा (६ मीटर) पूर्णपणे मोकळी ठेवावी. जेणेकरून अग्निशमन वाहने सहजपणे व विनाअडथळा दुर्घटनास्थळी पोहोचून अग्निशमन व विमोचनाचे कार्य तत्काळ सुरू करतील. ज्यामुळे जीवितहानी टाळता येईल व वितहानी कमी होण्यास मदत होईल. इमारतीतील रहिवाशांनी या सामाजिक बांधिलकीचे काटेकोरपणे पालन केल्यास हे शक्य आहे.

२. इमारतीच्या अंतर्गत भागातील बाल्कनी, कॉरीडोअर, लिफ्टलॉबी व स्टेअरकेस : या मोकळ्या जागा बहुतांशी सर्वच रहिवासी व व्यावसायिक इमारतीमध्ये असे पाहावयास मिळते की, प्रत्येक मजल्यावरील कॉमन कॉरीडोअर, पॅसेज व लिफ्टलॉबीमध्ये त्या मजल्यावरील रहिवासी स्वतःच्या घरातील अतिरिक्त किंवा टाकाऊ असलेले सामान साठवून ठेवण्यासाठी आपल्या हक्काच्या जागा आहेत असे सर्वमान्य केलेले आहे. इमारतीतील मजल्यास, एखाद्या घरास आग लागल्यास सदर आग घराबाहेर पसरली, तर कॉरीडोअर, पॅसेजमध्ये ठेवलेले लाकडी सामान, चपलांचे स्टँड, गैरसोयीचे फर्निचर इत्यादी वस्तू पॅसेजमधून आग पसरविण्यास मदत करतात. तसेच बऱ्याचवेळी असे देखील निदर्शनास येते की, इमारतीतील कॉरीडोअर, पॅसेजमध्ये धातूच्या तारा अथवा दोऱ्या बांधून सदर भाग कपडे वाळविण्यासाठी वापरला जातो. सदर कपडे वाळत घालण्याच्या छत किंवा भिंतीवरून इलेक्ट्रिक वायर किंवा केबल गेलेल्या असतात ज्या गोष्टी आगीचा प्रसार करण्यास प्रामुख्याने हातभार लावतात. तरी सर्व रहिवाशांना असे आवाहन करावेसे वाटते की, घरातील अतिरिक्त सामान कॉरीडोअर, पॅसेज, लिफ्टलॉबी व जिने यामध्ये ठेवून अडथळा निर्माण करू नये.

३. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा व त्यांची कार्यक्षमता : मुंबईची जमिनीशी समांतर असणारी वाढ गेल्या काही वर्षांत पूर्णतः खुंटलेली आहे. बहुमजली इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना स्वतः, स्वतःचे कुटुंब व इतर लोकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतेही देणेघेणे नसणे व सुरक्षिततेबाबत असलेले सामाजिक भान याचा अभाव दिसतो. त्यामुळे बहुमजली इमारतींच्या अंतर्गत अग्नी सुरक्षिततेची साधने व्यवस्थित कार्यरत आहेत किंवा नाही? इमारतीच्या विद्युत डक्ट / शाफ्ट प्रत्येक माळ्यावर सिल केलेले आहेत किंवा नाहीत? अग्नीशमन पंप कार्यरत आहेत किंवा नाहीत? प्रत्येक माळ्यावरील हायड्रन्ट पॉइंट, होजरिल, फायर अलार्म चालू स्थितीत आहेत किंवा नाही याचाचत पूर्णतः अनास्था आढळून येते. इमारतीच्या प्रत्येक माळ्यावरील विद्युत डक्ट म्हणजे घरातील अडगळीचे सामान साठवून ठेवण्याची प्रत्येकाची हक्काची जागा असे समजताना त्यामागील धोके कधीच गांभीर्याने का घेत नाही? प्रत्येक मजल्यावरील कॉरीडोअर मधून जिन्यामध्ये उत्तरण्यापूर्वी लावण्यात आलेले अग्नी प्रतिरोधक लाकडी दरवाजे बऱ्याचदा काढलेले आढळतात किंवा त्याची स्वयंचलित बंद होण्याची व्यवस्था नादुरुस्त अवस्थेत असते.

४. टेरेस व रिफ्यूज एरिया : आजकाल इमारतीमध्ये ओपन टेरेस व रिफ्यूज एरिया हा हाऊसिंग सोसायट्यांचा कम्युनिटी हॉल किंवा एन्टरटेनमेन्ट हब म्हणून वापरण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. इमारतीमध्ये आगीसारख्या दुर्घटना घडल्यास मजल्यावरील रहिवाशांच्या सुरक्षिततेचे ठिकाण म्हणून टेरेस व रिफ्यूज एरिया विनाअडथळा पोहोचण्यासाठी खुला व सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु इमारतीचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदर जागा व्यापणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशा थाटातच वावरत असतात व आपल्या अशा निर्बुद्ध वर्तनाने प्रत्येक रहिवाशांच्या जीवास धोका निर्माण करत असल्याची किंचितही जाणीव त्यांच्या मनास स्पर्श करीत नाही. इतक्या सर्वांच्या भावना बोथट झाल्या आहेत का? त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे की स्वतःच्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी इंटेरीअर डेकोरेशन व फर्निचरवर जसा लाखो रुपयांचा खर्च केला जातो तशीच दक्षता घरामध्ये पोर्टेबल फायर एक्सटिंगविशर, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकलर लावण्यासाठी घ्यावी. ९०% आगीच्या घटना या शॉर्ट सर्किटमुळे घडलेल्या असतात. इमारतीतील प्रत्येक घरात आधुनिक उपकरणे वापरताना इलेक्ट्रिक लोड किती आहे? दहा वर्षांमध्ये रिवायरींग करणे इतक्या साध्या गोष्टींचे भान देखील स्वतःला सुशिक्षित व उच्चभू मानणाऱ्यांनी ठेवले पाहिजे.

नगरविकास खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या समन्वयाने दर ६ महिन्याने फाचर ऑडिट आणि १ वर्षांनी इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जाण्यासाठी अंकुश ठेवला पाहिजे. या व्यतिरिक्त झाड पडणे, पूरस्थिती, लॅन्ड स्लाइड, हाऊस कोलॅप्स, लिफ्ट, मॅनहोल, फटाके यामुळे होणाऱ्या दुर्घटना याकरीता राज्यशासनाच्या यंत्रणा तोकड्या पडतात. अग्निशमन दल अत्याधुनिक होत असले तरी त्यांच्याकडे ९० मीटर उंची पर्यंत म्हणजे साधारणतः २८ मजल्यापर्यंतच पोहोचणारी लेंडर, ५५ मीटरचा वॉटर टॉवर, रिमोट कंट्रोल रोबोट उपलब्ध आहेत ते हाताळताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. रेस्क्यू आणि फायर फायटींग ड्रोन, फायर सर्व्हिस सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी अभ्यासू फायर फायटर प्रयत्नशील आहेत.

टोलेजंग इमारती, कोस्टल रोड, फिवे, स्काय वॉक, मेट्रो इत्यादीचा ध्यास घेतलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालिन सेवा देणाऱ्या अग्निशमनदल, रुग्णवाहिका, पोलीस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी आपले घर व इमारतीतील विद्युत उपकरणे व स्वयंचलित यंत्रणा, एल.पी.जी. गॅस / पी.एन.जी. गॅसलाईन तसेच कायम स्वरुपी अग्निशमन या याची गव्हर्नमेंट अप्रूव्हड लायसन्स एजन्सीकडून वारंवार तपासणी तथा योग्यवेळी दुरुस्ती व परिक्षण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या युगामध्ये शाळा, महाविद्यालये, सरकारी व खासगी व्यवस्थापनामध्ये अग्नीसुरक्षा व आपत्कालिन व्यवस्थापन प्रशिक्षण सर्वांना कायद्याने सक्तीचे करावयास पाहिजे. असे झाल्यास दुर्घटनेच्यावेळी नागरिक लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा व लोकनियुक्त सरकार यांची एकमेकांवर चिखलफेक करून आपली जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीला आळा बसेल जेणेकरून स्वहित, समाज व देशाच्या प्रगतीसाठी हातभार लागेल यात तिळमात्र शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -