उबाठा शिवसेनेचा निर्धार मेळावा नाशिकमध्ये पार पडला, अर्थात हा उबाठा शिवसेनेच्या प्रमुखांच्या भाषणांमध्ये गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून फारसे काही नावीन्यच शिल्लक न राहील्याने निर्धार मेळावा हा विनानिर्धारानेच पार पडल्याची नाराजीची चर्चा खुद्द उबाठा सेनेमधील शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. पूर्वी शिवसेनेचा मेळावा कोठेही असो, शहरी भागात होवो अथवा ग्रामीण भागात होवो. मेळाव्यामध्ये शिवसैनिकांची गर्दी उत्स्फूर्त असायची, मैदानांमध्ये गर्दीचा उच्चांक करणारी असायची. दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा खुल्या पटांगणामध्ये बोलताना सुरुवातीलाच ‘येथे जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिकांनो’, अशी सुरुवात करायचे, त्यावेळी गगनभेदी जयघोषांच्या आरोळ्या होत असायच्या, शिवसेना जिंदाबाद, जय महाराष्ट्र या घोषणांनी आसमंत दणाणून निघायचा, पण हे सारे इतिहासजमा झाले आहे. शिवसेनाप्रमुखांचे पुत्र असणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्यात यश तर आलेच नाही, पण शिवसेनेचा तो दरारा, रुबाब, शिवसैनिकांचे प्रेमही टिकविण्यास अपयश आले. शिवसेनाप्रमुखांच्या केवळ आदेशावर ज्यांनी रक्ताचे पाणी केले, स्वत:च्या घरादारांकडे, मुलाबाळांकडे अगदी संसाराकडे कानाडोळा करून ज्यांनी संघटना वाढविली, त्यांनाच संघटनेच्या कामकाजातून अलिप्तता स्वीकारण्यास भाग पाडण्यास उद्धवच्या नेतृत्वाने सुरुवात केल्यावर संघटनेच्या पडझडीला सुरुवात झाली आणि या गोष्टीला, आजच्या शिवसेनेच्या वाताहतीला दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेच जबाबदार आहे. वारसा हा विचाराने आणि कर्तृत्वाने यायला लागतो, तरच त्या संघटनेची घोडदौड होते. शिवसेनाप्रमुखांचा वारसा केवळ मुलगा या नात्याने उद्धव ठाकरेंकडे आला, पण कर्तृत्व आणि विचारधारा, संघटनाबांधणी यात योगदान शून्य असल्याने तसेच निष्ठावंतांवर अन्याय केल्याने हा वारसा केवळ कागदोपत्रीच राहीला. त्यामुळेच शिवसेना संघटनेत फाटाफूट झाली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली तब्बल ३९ आमदारांनी, विधान परिषदेच्या अनेक आमदारांनी, अधिकाधिक पदाधिकाऱ्यांनी, सर्वाधिक माजी नगरसेवकांनी आणि बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव ठाकरेंपासून वेगळी केली आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे असलेल्या सेनेला राजकारणात उपहासाने शिल्लक सेना या नावाने संबोधले जावू लागले. एकेकाळी मोठमोठी क्रिडांगणे कमी पडेल इतकी अफाट गर्दी असणारे शिवसेनेचे मेळावे आता उद्धव ठाकरेंना बंदीस्त हॉलमध्ये घेण्याची वेळ आली आहे. दुपारचे कडक ऊन मान्य असले तरी सांयकाळी मेळावे घेण्यास हरकत नव्हती; परंतु आता पूर्वीसारखे वलय न राहिल्याने, दरारा न राहिल्याने आणि शिवसैनिकही न राहिल्याने ‘झाकली मुठ सव्वा लाखांची’ या उक्तीप्रमाणे हॉलमध्ये मेळावे घेऊन तीच तीन भाषणे, तेच तेच मुद्दे, तेच तेच आरोप यामुळे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये नावीन्यही राहिलेले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या मेळाव्यानंतर शिवसैनिकांना आदेश मिळायचा, एक नवीन विचार मिळायचा, सभेतून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर एक तेज आणि नजरेमध्ये अंगार पाहावयास मिळत असे. पण आता हे सर्व इतिहासजमा झाले आहे. मुळातच असंगाशी संग केल्यावर परिणामाची किंमत मोजावी लागतेच, तेच आज उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडले आहे. पण संघटनेत मोठ्या प्रमाणावर पडझड होऊनही, शिवसेनेच्या मातब्बर सरदारांनी साथ सोडूनही त्यातून उद्धव ठाकरे कोणताही बोध घेण्यास तयार नाहीत आणि आपला हेकेखोरपणा सोडावयास तयार नाहीत. त्यामुळेच शिल्लक सेनेमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे.
शिवसेना वाढली ती शिवसैनिकांच्या परिश्रमावर, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर, शिवसेनेत असलेल्या तत्कालीन नेत्यांनी शहरी व ग्रामीण भागांत केल्यावर संघटना बांधणीवर. अर्थात या सर्व लोकांचे प्रेम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर होते. उद्धव ठाकरेंचे त्या काळात संघटना आणि संघटना बांधणीमध्ये काडीमात्रही योगदान नव्हते. ज्या नाशिक शहरातून शिवसेनेच्या महाअधिवेशनातून राजकीय सारीपाटावर उद्धव ठाकरेंचे संघटनात्मक पर्दापण झाले, अर्थात शिवसेना त्या काळात सर्वोच्च शिखराच्या दिशेने वाटचाल करत होते. अनेक राजकीय घटक उद्धव ठाकरेंचा भाषणातून उल्लेख ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा’ असाच करतात. नाशिकच्या त्या महाअधिवेशनात संघटनात्मक पदावर खऱ्या अर्थाने राज ठाकरेंचा अधिकार होता, पण त्यांना डावलून तो अधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आला. २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्रितपणे निवडणूक लढली, पण भाजपाला स्ववळावर सत्ता मिळणे शक्य नसल्याचे लक्षात येताच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी मुख्यमंत्रीपदासाठी सोबत केली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळाले, पण शिवसेना संघटना मात्र त्यांना शिवसेना नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांसह, शिवसैनिकांसह गमवावी लागली. वडिलांनी निर्माण केलेली, नावलौकीकास आणलेली संघटना पुत्राने केवळ मुख्यमंत्री पदासाठी गमावली, असा शिक्का उद्धव ठाकरेंवर लागला आहे. संघटनेची पडझड थांबविण्यासाठी, शिल्लक सेनेत राहिलेल्या उरल्यासुरल्या शिलेदारांना सांभाळण्यासाठी, शिवसैनिकांसाठी कोणतीही नवीन ठोस भूमिका उद्धव ठाकरे घेत नसल्याने मागील साडेतीन वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंच्या भाषणातही तोचतोचपणा पाहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेने महाराष्ट्रीय जनतेचा जनाधार गमाविल्याने अवघे १५च आमदार त्यांचे निवडून आले आहेत. उलटपक्षी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संख्याबळात पूर्वीच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. जनतेने एकनाथ शिंदेंचीच शिवसेना यावर एकप्रकारे मतपेटीतूनच शिक्कामोर्तब केले आहे. मुस्लीमधार्जिण्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी उद्धव ठाकरेंनी केलेली सोबत आजही शिवसैनिकांच्या व जनतेच्याही पचनी पडलेली नाही. त्यामुळे त्यांनी याचा संताप विधानसभा निवडणुकीत मतदानातून काढला आहे. गेली साडेतीन वर्षे तीच अर्थहीन भाषणे, कणाहिन नेतृत्व, विचारांचा, धोरणांचा अभाव, सर्व काही गमावूनही हेकेखोरपणाचा ताठपणा यामुळे उबाठांच्या शिल्लक सेनेमध्ये नजीकच्या काळात कोण शिल्लक राहील, हाच आज एक संशोधनाचा विषय आहे.