मुंबई :राज्यात काही भागात पावसाचे वातावरण असले तरी बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील हवामान असेच राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पश्चिम राजस्थानमधील सर्व किंवा बऱ्यापैकी भागात १७, १८ एप्रिल तर गुजरातमध्ये आज १७ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची देखील शक्यता आहे. गुजरातचा काही भाग, केरळ आणि माहे तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज १७ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.दरम्यान, पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील ५ दिवसांत वीज आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भ आणि छत्तीसगडच्या मैदानांवर १७ आणि १८ एप्रिल रोजी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किमीपर्यंत पोहोचू शकेल. १७ आणि १८ एप्रिल रोजी बिहार, आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मुसळधार पाऊस, तर पश्चिम बंगाल व बिहारमध्ये १७ व १८ एप्रिलला वादळासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये पुढील ५ दिवस विजांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळ व माहे येथे १७ ते १९ एप्रिलदरम्यान जोरदार वारे व विजांचा संभव असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.