मुंबई : अनेक विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधील सागर कारंडे नेहमीच त्याच्या विविध भूमिकेसाठी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर कारंडे एका मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढला गेला होता. त्यानंतर सागरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. सागरच्या तक्रारीनुसार अखेर पोलिसांनी फसवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर कारंडेच्या व्हॉट्सअॅपवर एका महिलेने एक लिंक पाठवली होती. ज्यामध्ये अभिनेत्याला इन्स्टाग्राम पेज लाईक केल्यानंतर पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. तसेच, प्रत्येक लिंकमागे प्रत्येकी १५० रुपये देण्याचं आमीष दाखवण्यात आलं होतं. अभिनेता महिलेच्या जाळ्यात अडकला. सुरुवातीला त्याला एका पेजला लाईक करण्यासाठी १५० रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं. महिलेनं सागरला सुरुवातीला काही पेजच्या लिंक पाठवून त्याला लाईक करायला सांगितलं. सागरनं ते पेज लाईक केल्यानंतर त्याला त्याबदल्यात पैसे दिले गेले. सागर जाळ्यात अडकलाय हे कळताच सायबर भामट्यांनी पुढचं जाळं टाकलं.
Rohit Sharma Stand : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!
सायबर भामट्यांनी सागरला गुंतवणुकीची स्किम देऊ केली. त्यानुसार सागरनं सुरुवातीला २७ लाख गुंतवले. काही काळानं अभिनेत्यानं पैसे काढण्याचाही प्रयत्न केला, पण त्याला सायबर चोरट्यांनी टास्क पूर्ण झाल्यावर पैसे पूर्ण मिळतील असं आश्वासन दिलं. पुढे सायबर चोरट्यांनी ८० टक्के काम झालेलं आहे. यात आणखी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असं सांगितलं. त्यानंतर त्या अभिनेत्यानं १९ लाख आणि त्यावर ३० टक्के कर भरला. अशी एकूण ६१ लाख ८३ हजारांची गुंतवणूक केली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचं समजताच सागर कारंडेनं तात्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेऊन अक्षयकुमार गोपलन या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, सागर कारंडेनं केलेल्या गुंतवणूकीतून ४ लाख ५९ हजार आरोपी अक्षयनं आपल्या मित्राच्या खात्यातून रोखीनं काढले. त्याचं Crypto चलन आंतरराष्ट्रीय बाजारात खेरेदी आणि विक्री करून नमूद रकमेची विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासांत समोर आलं आहे.