Saturday, April 19, 2025

मोहाचा महापूर

अरविन्द दोडे

जे गुणघनाचेनी वृष्टिभरे |
भरली मोहाचेनी महापुरे |
घेऊनी जात नगरे |
यमनियमांची ॥७.७१॥

जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्यानं मोहरूपी महापुरानं भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते, जी द्वेषरूपी भोवऱ्यानं दाट भरलीय. मत्सररूपी वळणं तिला पडलीएत, अशा विकारांनी हाहाकार माजवलाय, त्याबद्दल थोडंसं – काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा शत्रू हैराण करतात. या सहांपैकी एक जरी हात धुवून पाठीस लागला, तर भलेभले ऋषिमुनी वाया जातात, हे आपण ऐकून आहोत. ‌‘मोह म्हणजे मनाची एक अवस्था किंवा भावना.’ त्या भावनेत माणूस हरवतो, हरपतो, हपापतो, हरखून जातो. त्यातून बाहेर पडणं महाकठीण. आकर्षणानं वेडा होतो. ती गोष्ट हवीच. त्यासाठी माणूस वाटेल ते करतो. सामान्यांबद्दल काय सांगायचं? सात्त्विक, सुंदर मोह जीवनाला शोभा आणतो. यश मिळवून देतो. तोच जर तामसी असेल, तर सर्वनाश करतो. मोह आणि प्रेम यांच्यात फरक आहे. दुसऱ्यासाठी धडपडणं, कुणाच्या सुखासाठी जगणं हा समर्पणाचा सेवाभाव असला तरी त्यात आनंद वाटतो. सत्ता आणि संपत्तीचा मोह शरीरसुखाच्या अतिरिक्त मोह हा घातकच असतो. म्हणून सर्व चांगल्या गोष्टींबाबत प्रेम असावं, मोह नको. मोहातून स्वार्थ निर्माण होतो. अहंकार जन्म घेतो. मग इतर सर्वनाश करणाऱ्या घटना घडतातच. हा विषय विस्तारानं पुढे येणारच आहे. तूर्त विचार करायचाय तो गुरुभक्तीचा! गुरू-शिष्यांच्या प्रेमाचा, गुरुदेव स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांचा अनन्य शिष्य स्वामी विवेकानंद यांची एक अविस्मरणीय बोधकथा आहे, ती अशी – गुरुदेवांना कर्करोगाचा त्रास होत होता. खोकल्यानं ते हैराण झाले होते. पोटभर भोजन करणं अशक्य झालं होतं. विवेकानंद त्यांची दयनीय अवस्था पाहून फार व्याकूळ होते. गुरुदेव त्यांची तळमळ बघत. एकदा त्यांनी म्हटलं,

“नरेन्द्र! मला आठवतात ते दिवस… तू घर सोडून रोज या मंदिरात येत असे. तू दोन-दोन दिवस काही खात नसे. तुझी परिस्थिती आणि मन:स्थिती अत्यंत वाईट होती. तू आईला सांगत असे, ‌‘मी मित्राकडे जेवलोय. कारण, तुझं भोजन छोट्या भावाला मिळावं हा तुझा हेतू, होय ना?” विवेकानंदांना ते नरेन्द्र म्हणत. विवेकानंद अश्रू ढाळत उभे होते. त्यांनी ‌‘होय’ म्हटलं. तेव्हा त्यांच्या जवळ येऊन गुरुदेव म्हणाले, “ तू हसून प्रसन्नपणे सेवा करत असे, पण मला त्वरित जाणीव होत असे, तू उपाशी आहेस ते. मी तुला आपल्या हातानं कालीमातेचा प्रसाद खाऊ घालत असे. कधी लाडू, कधी पेढे, कधी लोणी तर कधी रसगुल्ले. आठवतंय ना तुला? मला हे कसं कळत होतं ठाऊक आहे? ते कसं?” “गुरूदेव, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. तुम्ही शिष्यांच्या अंतरात वास करता म्हणून!” “मी तुझ्या मनात, चित्तात शिरतो. प्रत्येकाचं मन असंच समजून घेतो. त्यांची सुखदु:खं जाणतो. तो तृप्त आहे की, अतृप्त हे समजतो. मला सांग, माझी तृप्ती जाणवते की नाही?” “तृप्ती? ती कशी गुरूदेव?” “तू भोजन करतोस. तृप्त होतोस. मग मी तृप्ती अनुभवत असेल की नाही? अरे वेड्या, मी माझ्या भक्तांची व्यथावेदना भोगतोय. असंख्य शिष्यांच्या मुखानं मीच खातो. म्हणून मी काय तृप्त असतो. गुरू-शिष्य दोन दिसतात. मनानं एक असतात. उद्या मी देहरूपानं नसेल, पण मी शिष्यांमध्ये वास करीनच की नाही?”

तात्पर्य सांगायला नकोच! गुरूची उपासना करताना आणखी काय करतात? स्वरूपदर्शन घडविणाऱ्या गुरूचं चिंतन म्हणजे ईश्वराचं चिंतन. नामसंकीर्तनही तसंच असतं. गुरूदेव आणि इष्टदेव एकच. ही उपासना प्रभावी असते. एका गुरूची पूजा म्हणजे सर्व देवदेवतांची पूजा. महादेव गुरू उपासनेचं रहस्य पार्वतीला सांगतात,
यत्पाद रेणुकणिका |
कापी संसारवारिधे: |
सेतू बंधायते नाथं |
देशिकं तमुपास्महे ॥५८॥

ज्याच्या चरणधुळीचा एक कणसुद्धा समुद्र पार करणारा सेतू होतो, अशा त्या गुरुनाथाची मी उपासना करतो. गुरुचरणाच्या धुळीचा एक कणसुद्धा किती महत्त्वाचा असतो. समुद्र ओलांडून जाण्यास जसा पूल उपयुक्त ठरतो, तसा भवसागर तरून जाण्यास चरणधुळीचा एक कण पुरेसा असतो. तो विभूती किंवा गंध समजावा. श्रद्धेनं कपाळी लावावा. जिथं गुरू तिथं पावित्र्य. देहू, आळंदी, पंढरपूरसारख्या खेडेगावांमध्ये काय होतं? भगवंत आला किंवा संतांनी वास केला अन्‌‍ ती साधारण गावं, असाधारण तीर्थक्षेत्रं झाली. अक्कलकोट, शेगाव, शिर्डी, सासवड, पुणतांबा, मुक्ताईनगर, मंगळवेढा… असंख्य. देवभक्त आणि देशभक्त यांची स्थानं म्हणजे तीर्थच! संतांनी पंढरपूरला म्हटलंय, ‌‘सकल तीर्थांचं माहेर.’ सासुरवाशीण माहेराला ‌‘तीर्थसागर’ म्हणते. तिथं माता-पिता असतात. मायेची माणसं असतात.

मोहाचा ताप इतर तापात अधिक तापदायक असतो. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे तीन ‌‘ताप’ प्रत्येकाला ताप देतात, पण ते दूर करणं केवळ गुरूच्या उपासनेनंच शक्य होतं. आध्यात्मिक म्हणजे देह, मन, बुद्धीच्या पातळीवरचे व्यक्तिगत दोष. आधिभौतिक म्हणजे व्यक्ती, वस्तू, प्रतिकूलता होत, तर आधिदैविक म्हणजे वारा, वादळ, पाऊस, भूकंप, दुष्काळ, पंचमहाभूतांपासून आलेली संकटं होत. नैसर्गिक आपत्ती येतात, त्यांच्यावर ताबा कोण ठेवणार? सारे अडथळे दूर करतो तो गुरू. सर्व संकटांवर मात करण्याचं आत्मबळ देतो तो गुरू. आधिव्याधींपासून वाचवतो तो गुरू. सर्वत्र, सदासर्वकाळ ब्रह्मांडावर स्वामित्व गाजवतो तो गुरू. पंचमहाभूतांना ताब्यात ठेवतो तो गुरू. म्हणून उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ असतो तो एकमेव गुरू! गुरूप्रेमाचा महिमा अगाध आहे. भक्तीच्या भांडवलावर भक्त कृपाप्रसादाचा अधिकारी होतो. श्रीमंत होतो, अर्थात आतून. हा मार्ग साधा, सरळ, सोपा आहे. पुढे सांगायचा आणखी एक मुद्दा म्हणजे गुरूच्या अनुग्रहाचा परिणाम –
यस्मादनुग्रहं लब्ध्वा |
महत्‌‍ज्ञानमुत्सृजेत |

भगवान महेश उमादेवीला म्हणतात, ‌‘हे प्रिये, ज्याचा अनुग्रह प्राप्त झाल्यानं अज्ञानाचा नाश होतो, अशा गुरूदेवास इष्टसिद्धींसाठी नमस्कार करावा. ‌‘मी देह आहे’ ही भावना. ‌‘मी आत्मा आहे’ हे ज्ञान. यासाठी एकच उपाय – गुरूला शरण जाणं. अज्ञान म्हणजे माया. ज्ञान म्हणजे सत्य. आपलं शिष्यत्व पूर्ण असेल, तर पूर्णत्व पावलेला गुरू भेटतोच. इष्टप्राप्ती तोच देतो. विपत्ती निवारतो अशा गुरूला पुन्हा पुन्हा वंदन करणं हीच उपासना. मोहाच्या महापुरातून तोच बाहेर काढतो. तेव्हा त्याची गाथा ऐकावी. गावी. ऐकवावी, वाचावी आणि पुन्हा पुन्हा आठवून अविवेकाची काजळी झाडावी! जय गुरूदेव!
([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -