नवी मुंबई : उन्हाचा वाढता जोर आणि त्यात वातावरणात अचानक बदल यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक दिसून येत आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचंड उष्मा सुरू झाला असून, अंगाची लाही लाही होत आहे. कधी सकाळी थंड वातावरण, तर मध्येच सकाळपासूनच उष्मा जाणवत आहे. यामुळे नागरिक आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरोघरी दुपारच्या सुमारास पंख्यांचा जोर वाढला आहे, तर वातानुकूलित यंत्रणेचा वापर सर्वाधिक करण्यात येत आहे. दिवसेंदिवस गर्मी वाढत जात असल्याने उष्माघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, उन्हामध्ये फिरू नये, तापमानाच्या ठिकाणी काम करणे टाळावे, बर्फाचे पदार्थ खाणे टाळावेत, पाणी पिताना ते स्वच्छ आहे का? याची खात्री करावी, धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे. उन्हाळ्यात पाणी दूषित होण्याचा अधिका धोका असतो, त्यामुळे पाणी पिताना काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, असा सला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
शिवाय वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या गर्दीत वाढ होऊ लागली आहे.