पुणे : ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव माहिती नसलेला पुणेकर सापडणे दुर्मिळ. पण चितळे या नावाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार पुण्यातच घडला आहे. हा प्रकार उघड होताच पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’च्या मालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार ? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?
स्वीय सहायक म्हणून चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे चार वर्षांपासून नोकरी करत असलेल्या नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी तक्रार केली. यानंतर चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (२), ३५० व आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्जाची चौकशी केल्यानंतर, या प्रकरणी बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
Dombivli News : डोंबिवलीतील खेळाडूंची शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराला गवसणी!
नमकीन श्रेणीत चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी लोकप्रिय आहे. पण काही ग्राहकांनी बाकरवडीची चव बदलल्याची तक्रार केली. हा प्रकार कळल्यावर चक्रावलेल्या नितीन दळवी यांनी बाजारात चौकशी सुरू केली. काही पाकिटे विकत घेऊन पाहणी केली. यावेळी चितळे नावाशी साधर्म्य साधणारा एक नवा ब्रँड बाजारात आल्याचे आणि हा ब्रँड ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आणि चितळे स्वीट होम यांची पुणेरी स्पेशल बाकरवडी या दोन्हीत तफावत आहे. पण पॅकिंगवर चितळे बंधू मिठाईवाले यांचा अधिकृत ई-मेल आयडी, ग्राहक क्रमांक (कंझ्युमर नंबर), मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, संपर्क क्रमांक छापला होता. हा प्रकार करुन चितळे स्वीट होम हे त्यांची बाकरवडी ही चितळे बंधू मिठाईवाले यांचीच बाकरवडी असल्याचे भासवून विकत होते. या प्रकरणात अधिकृत ब्रँडच्या माहितीचा गैरवापर सुरू असल्याची स्वतंत्र तक्रार चितळे बंधू मिठाईवाले यांचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी पुणे पोलिसांकडे नोंदविली आहे.