Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

MP Narayan Rane : खा. नारायण राणे आज बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार

MP Narayan Rane : खा. नारायण राणे आज बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार

मुंबई : बेस्ट उपक्रम हा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे मुंबई महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला असून बुधवारी ते यावर चर्चा करण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर श्रीनिवासन यांची बेस्ट भवन कुलाबा येथे भेट घेणार आहेत.



बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. बस गाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे परिवहन सेवेवर ही परिणाम झाला आहे. विद्युत विभाग ही दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात खासगीकरण झाल्याने बेस्ट बससेवा ही पूर्णपणे ढेपाळली असून बेस्टला कामगारांचे पगार देण्यासाठीही मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागत आहे. प्रवाशांना वेळेवर बस मिळत नसल्याने बस प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपली हक्काची देणे मिळवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागत असून हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी अजून बाकी आहेत. स्वमालकीच्या बस खरेदी कराव्यात, कर्मचाऱ्यांची भरती करावी व बेस्ट उपक्रम वाचवावा, यासाठी आतापर्यंत अनेक संघटनांनी पुढाकार घेतला होता.


आता बेस्टच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार नारायण राणे हे मैदानात उतरले असून नारायण राणे यांच्याच समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी नारायण राणे हे बेस्ट महाव्यवस्थापक एस.व्ही.आर श्रीनिवासन यांना भेटणार असून कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे कर्मचारी कुलाबा येथे उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment