मुंबई : क्रिकेटचा किल्ला वानखेडे! जिथं इतिहास घडतो आणि आता, त्या इतिहासात एक नवीन नाव कोरलं जातंय – हिटमॅन रोहित शर्मा! मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने नुकत्याच झालेल्या त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. वानखेडे स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियन – लेव्हल ३ ला आता नाव मिळणार आहे… ‘रोहित शर्मा स्टँड!’
होय, हाच तो रोहित – जो वानखेडेच्या गवतावरून चालत जगभरात ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला गेला. ज्याच्या बॅटमधून निघणाऱ्या चौकार-षटकारांनी वानखेडे गाजलं… त्याच रोहितच्या नावाचं आता एक हक्काचं स्टँड असणार आहे! हे स्टँड म्हणजे फक्त एक जागा नाही, तर एका प्रवासाची मान्यता आहे – बोरिवलीच्या गल्ल्यांपासून ते भारतीय संघाच्या कर्णधारपदापर्यंतचा प्रवास. आणि आता त्या प्रवासाला मिळालंय एक ऐतिहासिक वळण – आपल्या शहराच्या, आपल्या मैदानात. एमसीएने अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावानंही दोन स्टँड समर्पित केले आहेत – ग्रँड स्टँड लेव्हल ४ हे अजित वाडेकर स्टँड, आणि लेव्हल ३ हे शरद पवार स्टँड म्हणून ओळखलं जाणार आहे.
याच परिषदेत अमोल काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मॅच डे ऑफिसचं नावही एमसीए ऑफिस लाउंज असं ठेवण्यात आलंय. आणि हो – स्थानिक क्लब्ससाठी निधी ७५ कोटींपर्यंत वाढवण्याचा आणि तो १०० कोटींपर्यंत नेण्याचा निर्णयही याच वेळी झालाय.सचिन, गावस्कर, मर्चंट, वेंगसरकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत आता रोहितचं नाव येणं… ही फक्त गौरवाची गोष्ट नाही, ही आहे एका पिढीच्या नायकाला दिलेली मान्यता! वानखेडे आता अजून थोडं आपलं वाटणार आहे… कारण त्या स्टँडवर रोहितच्या नावासोबत असतील आपल्या आठवणी, आपल्या गर्जना आणि हिटमॅनच्या बॅटमधून निघणाऱ्या ‘सिक्सर’ चा आवाज! “वानखेडे, आता खरंच ‘हिटमॅनचं हाऊस’ झालंय!”