महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोककला आणि लोक कलाकारांविषयी अपार प्रेम आहे. लोककलेच्या माध्यमातून मराठी माणसाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक स्थान निश्चित करण्यासाठी लोक साहित्याने मोलाची कामगिरी केली आहे. विशेषत: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोककला संस्कृती जोपासली जाते; परंतु अलीकडे काही लोककला लोप पावत चालल्या आहेत. त्यातलीच एक उपेक्षित असलेली लोककला म्हणजेच पिंगळा.
पिंगळा बोलला पिंगळा बोलला, कुड कुड कुड रं !!
उठा उठा बायांनो, फाटफट्या पाराला !!
जोगी आलाय दारात धर्म येळात रं !!
पांगुळ सांगे विठ्ठल नाम घ्या हो !!
अरे कुणी मायबाप नावानं धर्म करा हो !!
पांगुळ आला रं…पांगुळ आला रं !!
संपूर्ण गाव ज्यावेळी निद्राधीन असतं त्यावेळी साधारण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरानंतर म्हणजेच साडेतीन ते चारच्या दरम्यान कुडमुड (डमरू) वाजवत तो गावाबाहेरच्या वस्तीतून गावात यायचा… धोतर, सदरा त्यावर काळा कोट, डोक्याला फेटा, त्या फेट्यावर देवी देवतांचे टाक असलेला चांद, कपाळावर भस्माच्या तीन पट्ट्या आणि त्याच्या मधोमध उभं लाल कुंकू, खांद्याला झोळी, एका हातात डमरू, तर दुसऱ्या हातात कंदील… पहाटेच्या निरव शांततेत रातकिड्यांच्या आवाजात पिंगळा वाजवत असलेल्या डमरूचा तो लयबद्ध नाद आणि मुखातून त्याने म्हटलेल्या पांडुरंगाच्या अभंगांची धून ऐकून जणू रात्रीला सुद्धा तिथे रेंगाळण्याचा मोह होत असावा… “ पांगुळ आला वं माय !! शकुन ऐक व माय”!! असं म्हणत पिंगळा दारोदारी भिक्षा मागत हिंडत असयचा. आपल्या संसाराचं भविष्य ऐकण्यासाठी मग घरातल्या बायका पसाभर धान्य त्याला देत असत. संसाराचे रहाटगाडगे चालवता चालवता कधी-कधी निराश होणाऱ्या मनाला पिंगळ्याचे भविष्य ऐकून तेवढाच थोडासा दिलासा मिळत असे.
पिंगळाही हे सर्व जाणून असायचा आणि म्हणूनच पसा-दीड पसा धान्य घेऊन तो भविष्य सांगायचा. अंधारलेल्या पहाटे येणारा पिंगळा सूर्य किरणांची चाहुल लागण्याआधीच उलट पावली परत आपल्या वस्तीकडे परत जायचा… पहाटेच्या प्रहरी गावागावांत हिंडून उदासीन मनाला भविष्य सांगून आशावाद दाखवणारा आणि जन मनावर गारूड घालणारा हा पिंगळा आता दुर्मीळ होत चालला आहे. वासुदेव, बहुरूप्यांप्रमाणेच पिंगळा हाही एक लोक कलाकार; परंतु बाकी लोक कलाकारांइतकी प्रसिद्धी मात्र त्याला मिळाली नाही. तो सदैव उपेक्षितच राहिला. पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रातील एक एक गाव पालथं घालणारा व आपल्या भविष्यवाणीने समाज मनावर भुरळ पाडणाऱ्या या पिंगळ्याच स्वत:च भविष्य मात्र अंधारमय आहे. असं असताना देखील फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोककला जोपासण्यासाठी त्याची धडपड चाललेली असते. त्याची पुढची पिढी शिकलेली असल्याने या इंटरनेटच्या दुनियेत ही लोककला जोपासण्यात त्यांना अजिबात रस नाही. समाजातील बदलत्या जीवनशैलीचा देखील त्याच्या कलेवर परिणाम झाल्याने त्याची पावले हळूहळू मागे सरू लागली आहेत. कंदीलाची जागा आता विजेचे दिवे आणि विजेरीने (टॉर्च) घेतली आहे. पहाटेची व्याख्या ही बदलली आहे. आता सकाळी साडेसात आठ वाजता पहाट होते. त्यातूनच आजकालच्या विषम परिस्थितीमध्ये पहाटे (चार वाजता) गावोगावी फिरणे म्हणजे एक प्रकारची जोखीम. त्यामुळे ही जोखीम उचलण्याची तयारी आजकालची पिढी दाखवत नसल्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकनाथ महाराजांच्या भारुडातला पिंगळ्याला आता जागृकतेची गरज आहे. विविध माध्यमातून त्यावर प्रकाशझोत टाकण्याची आवश्यकता आहे. तरच त्याची पुढची पिढी प्रसिद्धीसाठी या लोककलेला जोपासण्याचा प्रयत्न करेल. भविष्यासाठी ही लोकसंस्कृती जतन करावीच लागेल. नाहीतर पुढील पिढीला फक्त भारुडातच पिंगळा ऐकायला मिळेल. आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्यालाच ठसठशीतपणे उमटव्या लागतील नाहीतर त्या मिटायला वेळ लागणार नाही…
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…