जळगाव : यावल तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. बिबट्याने एका २ वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन लचके तोडल्याने संपूर्ण यावल तालुक्यात शेतकरी वर्गात, नागरिकांमध्ये, शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील ही सलग दुसरी घटना असून वनविभागाने उपाययोजना करून सुद्धा बिबट्या काही हाती लागत नाहीय.
गुरुवार १७ एप्रिल रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात असलेल्या ठेलारी समाजातील मेंढपाळाच्या २ वर्षांच्या मुलीला बिबट्या पकडून घेऊन गेला असल्याचा संशय नातेवाईकांचा आहे. आणि सदरील लहान मुलीचा मृतदेह जवळील शिवारात सापडलेला असून लहान मुलीचे लचके तोडून तुकडे केलेले दिसून आले आहे. या घटनेची माहिती सर्वात प्रथम महसूल विभागाला मिळाल्याने त्यांनी वन विभागाला सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मेट्रो मार्ग ७ अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ ब्रेक थ्रू ‘ यशस्वी
घटनास्थळी यावल तहसीलदार आणि यावल वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले असून पुढील कार्यवाही सुरू केल्याची माहिती मिळाली. यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात बिबट्या व वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणापासून काय काय उपाययोजना कराव्यात आणि कोणत्या प्रकारे दखल घ्यावी. याबाबत मात्र वन विभाग पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न करीत नसल्याने शेतकरी वर्गात सुद्धा शेतीची कामे करताना मोठ्या प्रमाणात भीती आणि दहशत निर्माण झाली आहे.
अनेक शेतकरी आणि मजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. या बिबट्यामुळे परिसरामध्ये प्राण्यांची दहशत निर्माण झालेली आहे. यासाठी तातडीने वरिष्ठ पातळीवरून एक्सपर्ट मागवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण स्तरावरून होत आहे.