ऋतुजा केळकर
हिंदू संस्कृतीत पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ‘पूजा’ या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थी ‘संपूर्णपणे त्या जगतजेत्या परमेश्वराला समर्पित होणे’ म्हणजे ‘पूजा’. तसे पाहायला गेले, तर मुख्य पूजांचे प्रकार हे तीन आहेत. प्रथमतः येते ती सात्विक पूजा. देव, देवी, ग्रह व इतर सत्त्वगुणी शक्तींची आराधना करून त्यांना प्रसन्न करून आपले जीवन सुखकर करण्याकरीता करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या पूजा होय. यात शांतता आणि सौम्यता असते. काही विशिष्ट नियम असतात. या प्रकारच्या पूजा या बहुतांशी निरपेक्ष असतात. म्हणजेच यात देवाकडून आपल्याला काही मिळावे अशी अपेक्षा भक्त करत नाही. त्यानंतर येते ती राजसिक पूजा. राजसिक पूजा म्हणजे वैभव, प्रसिद्धी, ऐश्वर्य मिळवण्यासाठी करण्यात येणारी पूजा म्हणजे यज्ञ याग होय. त्यानंतर सर्वात शेवटी येते ती तामसिक पूजा. ही पूजा सामान्यतः रात्री अगदी मध्यरात्रीदेखील केली जाते. ही अघोरी पद्धतीची असून यात अभक्ष्य भक्षण केले जाते. आपण हिंदू संस्कृतीतील मान्यतेनुसार या मुख्य पूजांचे प्रमुख आठ प्रकारात विभाजन करू शकतो ते पुढीलप्रमाणे नित्य पूजा, साप्ताहिक पूजा, मासिक पूजा, वार्षिक पूजा, होम-हवन पूजा, विशेष पूजा, अभिषेक पूजा, तंत्र पूजा.
सर्वप्रथम येते ती नित्य पूजा म्हणजे जी आपण प्रत्येक घरात करतो ती. यात साधारणपणे देवांना अंघोळ घालून धूप, दीप, अगरबत्ती, फुले आणि नैवैद्य अर्पण करून केली जाते. बहुतांशी घरामध्ये घरातील देवांची पूजा ही नेहमी घरातील पुरुष माणूसच करतो. त्यानंतर येते ती साप्ताहिक पूजा. ती म्हणजे अखिल ब्रम्हांडातील वेगवेगळ्या दैवतांची विशिष्ठ दिवशी केलेली पूजा म्हणजे सोमवारी शंकराची पूजा करणे, मंगळवारी देवीला जावून तिची आराधना करणे वगैरे. त्यानंतर येते ती म्हणजे मासिक पूजा. या प्रकारच्या पूजेत अमावस्या, पौर्णिमा, एकादशी किंवा संकष्टी चतुर्थी यांसारख्या विशिष्ठ दैवताच्या विशिष्ठ तिथीनुसार केलेल्या पूजा म्हणजेच मासिक पूजा होय. वार्षिक पूजेचे एक वेगळेच महत्त्व आहे. यात नद्या, सागर, पशुपक्षी म्हणजे नागदेवता म्हणा किंवा गोमाता आणि बैल यांची बैल पोळ्याला करतात ती पूजा किंवा नवरात्र तसेच दिवाळी किंवा गणेशोत्सव अशा प्रकारच्या पूजा यात मोडतात. होमहवन पूजा ही ब्राम्हण गुरुजींना बोलावून त्यांच्या हस्ते अग्नी प्रज्वलित करून विशिष्ट विधीवत केलेली पूजा असते. यात अगदी पुत्रकामेष्टी यज्ञापासून ते नवचंडी यागापर्यंत सगळे यज्ञ याग येतात. प्रत्येक यज्ञ यागाकरिता विशिष्ट पद्धतीची सामग्री वापरली जाते. त्यात यज्ञात जाळण्यात येणारे लाकूड देखील कधीकधी विशिष्ट पद्धतीचेच असते. घृत म्हणजे तूप, काळे तीळ, जव अशी वेगवेगळी यज्ञोपवीत असते. आता विशेष पूजा म्हणजे काय ते आपण पाहू या. आपण केलेले नवस फेडणे किंवा विवाह वास्तुशांत तसेच साठी किंवा सत्तरीची पूजा या प्रकारच्या पूजा या विशेष पूजा म्हटल्या जावू शकतात. त्यानंतर येणारी अभिषेक पूजा म्हणजे विविध देवांना केलेला पाण्याने दुधाने किंवा उसाच्या रसाने किंवा पंचामृताने म्हणजे दही, दुध, तूप, मध आणि साखर किंवा गुळ एकत्र करून त्याने पंचामृती स्नान घालणे किंवा अभिषेक करणे याला अभिषेक पूजा म्हटले जाते.
सर्वात शेवटी येते ती तंत्र पूजा. ही पूजा स्मशानात किंवा नदीच्या काठी किंवा निर्जन स्थळी केली जाते, ही पूजा सामान्य लोक करत नाहीत. ही पूजा तांत्रिक-मांत्रिक किंवा अघोरी करतात. या पूजेत मांस तसेच मद्य यांचा नैवैद्य देवाला अगर देवतेला दाखवला जातो आणि तोच भक्षण केला जातो. यात काली मातेची अघोरी पूजा होते. ही तामसिक पूजा म्हणून गणली जाते. शत्रू नाश किंवा तंत्र साधना ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ही पूजा केली जाते. ही पूजा करणारे तांत्रिक मांत्रिक हे कुंभमेळ्यात कायम हजेरी लावतात. असे पाहण्यात येते. यापेक्षा देखील कुणालाही माहीत नसलेल्या दोन वेगळ्या पूजा आहेत आणि त्यातील प्रथम पूजा म्हणजे ‘मानस पूजा’ या पूजेला मी सर्व पूजांमध्ये द्वितीय स्थान देते. कारण वरील सर्वच पूजांकरीता साधनसामग्री लागतात. विशिष्ट पद्धतीची तिथी ग्रह ताऱ्यांच्या स्थिती आवश्यक असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पूजेत संपूर्ण लक्ष नसले तरी यंत्रवत पूजा केली की झालं असेही मानून पूजा करणारेे काहीजण असतात, बरं या सर्व पद्धतीने काटेकोरपणे पूजा करूनही त्यात एक जरी गोष्ट कमी जास्त झाली, तर त्या पूजेचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या सर्वांवर अवलंबून असलेल्या या पूजांचे फळ देखील त्या त्या वेळेपुरते मर्यादित असते; परंतु मानस पूजेचे तसे नाही. यात सर्वप्रथम कुठल्याही साधन सामग्रीची गरज नसते. यात फक्त हवे ते एक मस्तक आणि दोन हस्त. एकाग्र चित्ताने मनातल्या मनात आपल्या आराध्याचे रूप डोळ्यांसमोर आणून त्याची शौडोपचार पूजा करायची. मनातल्या मनात त्याला अभिषेक घालायचा. त्याचे अंग पुसून गंध, अक्षता, फुले वाहून सुरेख वस्त्र अर्पण करून धूप-दीप दाखवून आपल्याला आवडेल तो एका वेळी कितीही प्रकारेचे, कितीही नैवेद्य दाखवायचे. भजन, कीर्तन करायचे आणि तेही मनातल्या मनात. त्यामुळे खऱ्या अर्थी आपण त्या दैवताच्या दैवत्वाशी जोडले जातो. तसेच हे सारे मानसिक असल्यामुळे आणि या पूजेकरिता कुठलेही नियम नसल्यामुळे आपण कुठेही केव्हाही ही पूजा करू शकतो.
त्यानंतर माझ्यासाठी सर्वांत शेवटची पण सर्वांत महत्त्वाची पूजा येते ती म्हणजे ‘कर्म पूजा’. आपले कर्म हाच आपला देव आहे असे मानून जे केले जाते ती कर्म पूजा. या सर्व पूजांमध्ये माझ्याकारिता सर्वश्रेष्ठ आहे. कारण या परमेश्वराने आपल्याला जे कर्म करण्याकरीता पाठवलेले आहे ते सोडून जर आपण या कर्मकांडातील पूजेत अडकून पडलो तर ते त्याला नक्कीच आवडणार नाही, हो ना? कारण अगदी माझ्या शब्दात सांगायचे झाले तर,
करम करते रहना प्यारे …
जाने कब आये बुलावा…
दिया जो काम खुदाने तुझको …
पुरा करके जाना है …