मुंबई : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी आस्वाद पाटील यांच्यासह शेकापच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांचे पंडीत पाटील हे भाऊ आहेत, तर आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांच्या भगिनी माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आहेत. पंडीत पाटील आणि आस्वाद पाटील यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच राजकीय फूट पडली आहे.
Mahadnyandeep Portal : महाज्ञानदीप पोर्टल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाँच
रविंद्र चव्हाण यांनी पंडीत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. शेकापच्या जुन्या आणि नव्या पिढीने एकत्रितपणे भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे रायगड जिल्हा शत प्रतिशत भाजपा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचा उत्तम जनसंपर्क आहे आणि ते तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात. या सर्व सदस्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा भाजपाला लाभ होईल; असेही भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते.
🪷रायगड जिल्ह्यात ‘शतप्रतिशत भाजपा’ होणारच ! 🪷
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राष्ट्र व महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे, हे विविध पक्षांतील नेते आणि पदाधिकाऱ्यांना पटवून देण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे.… pic.twitter.com/f4bPDdkdEf
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) April 16, 2025
ATM in Train : पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सुविधा, रेल्वेचा अभिनव प्रयोग
रायगड जिल्ह्याच्या विकासाकरिता भाजपात राहून काम करणार असल्याचे पंडीत पाटील म्हणाले. रायगड जिल्ह्यातील अपुरे प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, वडखल ते थळ प्रवासी रेल्वे व्हावी यासाठी पाठपुरावा करू; असेही पंडीत पाटील म्हणाले. मविआत असताना अनंत गीतेंचा प्रचार केला. पण निवडणुकीत हरल्यावर गीतेंनी माझा फोन घेणेच टाळले. महायुतीच्या विरोधात प्रचार केला तरी रायगड जिल्ह्यातील त्यांचे नेते विकासाच्या प्रश्नांसाठी मनमोकळा संवाद साधतात. खासदार तटकरे पण कधीही कॉल उचलतात; असे पंडीत पाटील म्हणाले.
अनेक नद्या उपनद्या पुढे गंगेला जाऊन मिळतात. गंगा ही मोठी नदी आहे. हाच विचार करुन रायगड जिल्ह्याच्या विकासाचे काम करण्याकरिता भाजपात प्रवेश केल्याचे पंडीत पाटील यांनी सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सुनील तटकरेंना जे मदत करतात, त्यांना तटकरे मदत करत नाहीत, हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे; असे सांगितले. शेकापने विविध पक्षांसोबत आघाडी केली. मात्र त्याचा लाभ आघाडी केलेल्यांना झाला, शेकापला झाला नाही. असेही पंडीत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देतेवेळी सांगितले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याचे उत्तर महाराष्ट्र दिनापर्यंत अर्थात १ मे पर्यंत तरी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजनाची बैठक अर्थमंत्र्याकडे झाली, हे लोकशाहीला घातक असल्याची टीकाही पंडीत पाटील यांनी केली.