Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mumbai : मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या कर्करोगासारखी, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आवाहन

Mumbai : मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या कर्करोगासारखी, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आवाहन
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील रस्ते आणि पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या कर्करोगाच्या आजारासारखी आहे. हा आजारात जसे उपचार केल्यानंतर थोड्या दिवसांनी बरे झाल्यासारखे वाटते आणि पुन्हा काही दिवसांनी तो आजार वाढतो,तसेच फेरीवाल्यांचे आहे.महापालिकेने कारवाई हाती घेतल्यानंतर काही दिवस परिणाम दिसून येतो आणि त्यांची पाठ फिरली की पुन्हा तिथे जावून बसतात. त्यामुळे फेरीवाल्यांबाबत सातत्याने केले जाणारे प्रयत्न करावे लागतील. हा केवळ लॉजिस्टीकचा विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. महापालिका एक वेळ कारवाई करु शकेल, पुन्हा ते येण्याची जबाबदारी एकट्या महापालिकेची असू शकत नाही, ते महापालिकेसोबतच पोलिस आणि स्थानिक नागरिकांचीही तेवढीच सामुहिक जबाबदारी असल्याचे परखड मतच महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी दादरमधील अमरहिंद मंडळाच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेतील बोलतांना मांडले.



आता रस्त्यावरील पदपथ आणि त्यानंतर त्यावर फेरीवाल्यांनी केलेली आक्रमणे ती अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न चालू असतात. आता त्यामागे एक समांतर अर्थव्यवस्था आहे. हप्ते गोळा केले जातात. हे कमी अधिक प्रमाणात खरे जरी असेल तरीही हे फेरीवाले हटवण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत असते हेही तेवढेच खरे आहे, ही महत्वाची बाब असल्याचे या व्याख्यानमालेत बोलतांना त्यांनी स्पष्ट केले.





पूर्वीच्या काळात काय झाले मला माहित नाही, पण अलिकडच्या काळामध्ये बरेचसे राजकारणी हे आता फेरीवाल्यांना काढा म्हणून आमच्या मागे असतात. बहुतेक सगळे, पूर्वीच्या काळामध्ये कदाचित त्यांना काढू नये म्हणून प्रयत्न झाले असतीलही. पण आता आमच्याकडे जे माजी नरसेवक आहेत, बरेचसे आमदार आहेत ते आता फेरीवाल्यांचा त्रास वाढत चालला आहे, त्यांना तिथू काढा अशी निवेदन घेवून येत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे स्टेशनच्या आजबाजुला असणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्या फेरीवाल्यांना हटवलेही जात आहे. पण हा प्रश्न म्हणजे कर्करोगासारखा आहे. जो उपचार केल्यानंतर थोड्या दिवसांनी बरा होतो आणि परत बळावतो. त्यामुळे अशा पध्दतीने ही सातत्याने केले जाणारे प्रयत्न करावे लागतील. हा केवळ लॉजिस्टीकचा विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. आणि त्याच्यामुळे मी सुध्दा बऱ्याच वेळेला ज्या ज्या ठिकाणी लोकांशी संपर्क साधतो त्यावेळेला आवाहन करतो. फेरीवाल्यांच्या जो प्रश्न निर्माण झाला आहे, हा फेरीवाल्यांमुळे जसा झाला आहे तसा काही प्रमाणात आजुबाजुला राहणाऱ्या नागरिकांमुळेही निर्माण झाला आहे. उद्या जर तेथील सर्व नागरिकांनी ठरवले की त्या फेरीवाल्यांकडून आपण काही खरेदी करणार नाही, तर आपोआपच त्यांचा धंदा बंद होईल. पण तसे आपल्या व्यवस्थेमध्ये होवू शकत नाही. हीसुध्दा वस्तूस्थिती आहे. या भागातील लोकांनी सांगितले, तर या भागातील फेरीवाल्यांकडून काही खरेदी करतच नाही तर, आम्ही एक वेळ त्यांना काढू. पण ते परत न येण्याची जबाबदारी फक्त एकट्या महापालिकेची असू शकत नाही, ती सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.महापालिका, पोलिस आणि स्थानिक नागरिकांची असेल. आम्ही फेरीवाल्यांना काढायला तयार आहोत. फेरीवाल्यांसाठी फेरीवाला धोरण लागू करण्याबाबतची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असून यावर निर्णय आल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment