Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Amravati : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू, आता मुंबई ते अमरावती फक्त दोन तास

Amravati : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू, आता मुंबई ते अमरावती फक्त दोन तास
अमरावती : मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतूक सुरू झाली आहे. पहिले प्रवासी विमान म्हणून अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. हे विमान अमरावती विमानतळावर उतरले. अमरावती विमानतळावर आगमन झालेल्या पहिल्या प्रवासी विमानावर जलतोरण उभारण्यात आले. विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली.



आता मुंबई - अमरावती प्रवासी विमान वाहतुकीमुळे अमरावतीसह विदर्भाच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाली आहे; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याआधी अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 या विमानातून मुंबई - अमरावती असा प्रवास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच मान्यवर यांचे अमरावती विमानतळावर आगमन झाले.



अमरावती विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी थोडा वेळ बातचीत केली. यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक छोटा व्हिडीओ केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. नवनीत राणा यांनी इतर प्रवाशांसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. विमान वाहतुकीमुळे विकासाला चालना मिळेल, असे त्या म्हणाल्या.



मुंबई ते अमरावती फक्त दोन तास

विमानामुळे मुंबई ते अमरावती हा प्रवास फक्त दोन तासांत होणार आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास सहा तासांवर आला आहे. लवकरच अमरावती येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र पण सुरू होत आहे. यामुळे अमरावतीतून देशाला नवे वैमानिक आणि प्रशिक्षक मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

असे आहे अमरावती विमानतळ

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १८५० मीटर असून रुंदी ४५ मीटर इतकी आहे.

आशियातील सर्वात मोठे एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र अमरावती विमानतळावर उभारले जाणार आहे.

अमरावती विमानतळावर एकाच वेळी एटीआर/७२ सीटर अशी दोन विमाने उभी केली (पार्क) जाऊ शकतात.

ऑक्टोबर २०२५ मध्ये अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होणार आहे.

अमरावती विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.
Comments
Add Comment