नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश भूषण गवई ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची पुढील सरन्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आगामी १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई हे ५२ वे सरन्यायमूर्ती म्हणून शपथ घेतील.
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत.त्यानंतर न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील आणि पदभार सांभाळतील. न्यायमूर्ती बी. आर. गवई हे २४ मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिने त्यांचा कार्यकाळ असेल. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होतील. न्यायमूर्ती गवई हे भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित असतील. त्यांच्यापूर्वी २००७ मध्ये दलित न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन हे देशाचे सरन्यायाधीश झाले होते.
न्यायमूर्ती बी. आर. गवई मुळचे महाराष्ट्रातील आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला आहे. १६ मार्च १९८५ रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १७ जानेवारी २००० रोजी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे.