मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे, मात्र यासोबतच आर्द्रतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या मुंबईत उकाडा,उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
आता पुढील तीन–चार दिवस आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवेल आणि विशेषतः सकाळी व संध्याकाळी अधिक घाम येण्याची शक्यता आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा चढतोच, मात्र यंदा आर्द्रतेत होणारी वाढ ही मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबईच्या तापमानाचा पाराही पुढील काही दिवस चढाच राहणार आहे.
नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र
यामुळे मुंबईकरांना उन्हाचा तडाखाही सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या तापमानात सोमवारपासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवेची द्रोणीय स्थिती तयार होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मे महिन्यात मुंबईतील स्थिती काय असेल ही चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होत आहे.