मुंबई : भारतीय रेल्वे ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. आज वंदे भारत, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस अशा वेगवान गाड्या आहेत. पण १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन धावली होती. ही १४ डब्यांची गाडी ओढण्यासाठी तीन वाफेची इंजिनं वापरण्यात आली होती. या इंजिनांची नावं अनुक्रमे साहिब, सिंध आणि सुलतान अशी होती. पहिली पॅसेंजर ट्रेन मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे अशी धावली होती. या गाडीला ३४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी सव्वा तास लागला होता. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी १६ एप्रिल हा दिवस भारतीय रेल्वे वाहतूक दिन किंवा भारतीय रेल्वे वाहतूक दिवस म्हणून साजरा केला जातो.
Mumbai : मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार, डी कंपनीकडून मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन धावली त्या घटनेला आज म्हणजेच १६ एप्रिल २०२५ रोजी १७२ वर्षे झाली आहेत. त्यावेळी बोरीबंदर ते ठाणे या पॅसेंजर ट्रेनमध्ये ४०० नामांकीत प्रवासी होते. गाडीचे १४ डबे एकाचवेळी ओढू शकेल असे शक्तिशाली इंजिन त्यावेळी उपलब्ध नव्हते. याच कारणामुळे तीन वाफेची इंजिन वापरुन गाडी चालवण्यात आली.
गाडी बोरीबंदर येथून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी निघाली. ठाणे स्थानकावर ही गाडी संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचली. या गाडीला बोरीबंदर स्थानकावर २१ तोफांची सलामी देण्यात आली. गाडी सुटली त्यावेळी उपस्थितांनी तसेच गाडीत बसलेल्या प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता.
ब्रिटिशांनी भारतात रेल्वेचे जाळे लोकांच्या गरजांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केले. सुरक्षितरित्या आणि वेगाने मालवाहतूक करण्यासाठी त्यांनी रेल्वेचे जाळे उभारले होते. मुंबईला ठाणे, कल्याण, थळ आणि भोर घाटांशी रेल्वे मार्गाने जोडण्याची कल्पना प्रथम मुंबई सरकारचे मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क यांना १८४३ मध्ये भांडुप दौऱ्यावर असताना सुचली होती. पुढे ही संकल्पना प्रत्यक्षात उतवण्यासाठी रेल्वेचे अभियंते आणि मजूर यांचा संघ काम करत होता.
मुंबईत रेल्वे सुरू झाल्यानंतर १५ ऑगस्ट १८५४ रोजी कलकत्ता (कोलकाता) येथील हावडा स्थानकावरुन एक पॅसेंजर ट्रेन हुबळीसाठी रवाना झाली. या गाडीने २४ मैल अंतर पार केले आणि हुबळी स्थानक गाठले. हा प्रवास व्यवस्थित झाला आणि पूर्व भारतीय रेल्वे सार्वजनिक वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दक्षिणेकडील पहिली गाडी १ जुलै १८५६ रोजी मद्रास (चेन्नई) रेल्वे कंपनीने सुरू केली. ही गाडी व्यासर्पदी जीव निलयम (व्यासरपदी) ते वलाजाह रोड (आर्कोट) अशी ६३ मैल धावली होती.
आता भारतीय रेल्वे झपाट्याने आधुनिक होत आहे. वेगवान गाड्या सुरू होत आहेत. आधुनिक सिग्नल व्यवस्था रेल्वे वापरू लागली आहे. जगातील सर्वात लांब रेल्वे फलाट (प्लॅटफॉर्म) भारतात कर्नाटकमध्ये हुबळी येथे आहे.