यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. या सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८८ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनेही १८८ धावाच केल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी केली. त्याने एका षटकांत ११ धावा केल्या. यात त्यांनी दिल्लीला विजयासाठी १२ धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून लोकेश राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीसाठी आले. दिल्लीने सुपर ओव्हरमधील पहिल्या बॉलवर २ धावा. त्यानंतर चौकार, त्यानंतर १ धाव आणि चौथ्या बॉलवर षटकार ठोकत सहज विजय मिळवला.
याआधी दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. यशस्वी जायसवाल आणि संजू सॅमसन यांनी चांगली सुरूवात करून दिली. मात्र ३१ धावांवर संजू सॅमसनला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. सलामीवीर यशस्वी जायसवालने ५१ धावांची खेळी केली. त्याने ३७ बॉलमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ही खेळी साकारली. रियान पराग केवळ ८ धावांवर बाद झाला. मात्र नितीश राणाने जबरदस्त खेळी करताना ५१ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार ठोकले.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीत उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकांत जोफ्रा आर्चरने मॅकगर्कला पॅव्हेलियनला धाडले. त्याने केवळ ९ धावा केल्या. त्यानंतर लगेचच पुढच्याच ओव्हरमध्ये करूण नायर बाद झाला. त्याला खातेही खोलता आले नाही. दरम्यान, यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेलने दिल्लील सांभाळले आणि एक चांगली भागीदारी केली. मात्र १३व्या षटकांत राहुलची विकेट पडली. राहुलने ३८ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक पोरेलही बाद झाला. यानंतर १७व्या षटकांत अक्षर पटेलही बाद झाला. त्याने ३४ धावा केल्या.