Sunday, October 26, 2025
Happy Diwali

नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र

नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र

मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. काँग्रेसला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत श्री. पाटील दानवे यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला .

यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे वास्तव समोर मांडताना श्री. पाटील दानवे म्हणाले की, 1937 साली उदात्त हेतूने 5 हजार स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केलेले हे वर्तमानपत्र आणि संबंधित कंपनी कधीही नेहरू, गांधी कुटुंबाची जहागीर नव्हती. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्रावर किंवा त्यांच्या मालमत्तेवर गांधी कुटुंबाची मालकी होती,अशा प्रकारची नोंद कुठेच नाही. त्यांना कायदेशीर अधिकार नाही. नॅशनल हेराल्डची मोठी मालमत्ता गिळंकृत करण्याचा कट काँग्रेसने रचून ‘यंग इंडिया’ नावाची कंपनी स्थापन केली आणि मालमत्तेचा दुरोपयोग करण्यात आला असा घणाघाती आरोप श्री. पाटील दानवे यांनी केला.

कालांतराने 2008 साली आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे या वर्तमानपत्राचे प्रकाशन थांबले. तेव्हा काँग्रेस पक्षाने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या कंपनीला 90 कोटींचा निधी दिला. खरेतर कोणत्याही खासगी संस्थेला पक्षाचा निधी देणे हे बेकायदेशीर असूनही काँग्रेसने हा निधी दिला असेही श्री. दानवे पाटील यांनी नमूद केले. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 साली काँग्रेस नेत्यांवर 'आर्थिक फसवणुकीचा' आरोप करत एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये 'यंग इंडिया प्रायव्हेट लिमीटेड'ने कवडीमोल रकमेत 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय काढला, जो 'नियमांच्या विरोधात' जाणारा आहे असे म्हटले होते. आता या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेने चौकशी केली असून पुढची कारवाई सुरू आहे असेही श्री. पाटील दानवे म्हणाले.

Comments
Add Comment