मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयएएस अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची एमएमआरडीएच्या सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर आर एस चव्हाण यांची बदली कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून वरिष्ठ पातळीवरील प्रशासनात खांदेपालट सुरू झाला. त्यामध्ये आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या आधी १ एप्रिल रोजी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाडीसकॉमचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, हिंगोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर सत्यम गांधी यांची सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांची डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आस्तिक कुमार पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील आहेत. इतिहास विषयात एमए पदवी मिळवण्याबरोबरच त्यांनी टेक्नोलॉजी मिडीवल इंडिया या विषयामध्ये पीएचडीही केली आहे. त्यांनी यूजीसी/जेआरएफ आणि एनईटी देखील उत्तीर्ण केले आहे. त्याने यूपीएससी सीएसई २०१० मध्ये पांडे यांनी ७४ वा क्रमांक मिळवला. ते २०११च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अस्तिक कुमार पांडे यांना झारखंड केडर देण्यात आले होते. मात्र आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर अस्तिक कुमार पांडे महाराष्ट्रात आले.