मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले धातूचे अडथळे (बॅरिकेड्स) जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्याने एक ६७ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. रितू आहुजा असे या महिलेचे नाव असून, त्यांच्या उजव्या मांडीला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना उपचारासाठी वॉकहार्ट रुग्णालयात दाखल केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी हे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र, अजूनही संबंधित ठेकेदाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती अंबोली पोलिसांनी दिली.
Mumbai : मुंबईतील फेरीवाल्यांची समस्या कर्करोगासारखी, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आवाहन
रितू आहुजा या शास्त्रीनगर येथे राहतात. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या लिंक रोडजवळील एका सत्संग हॉलकडे जात असताना हा अपघात घडला. या वेळी रस्त्याच्या कामासाठी ठेवलेले दोन धातूचे बॅरिकेड्स जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या अंगावर कोसळले, ज्यामुळे त्यांच्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली.
या प्रसंगी जवळून जाणाऱ्या डॉ. आरती ओरिया यांनी त्यांच्या मदतीला धाव घेतली. “दोन बॅरिकेड्स त्यांच्या अंगावर पडले होते. त्यांना तीव्र वेदना होत होत्या. मी लगेच ठेकेदाराला मदतीसाठी बोलावलं, पण तो पळून गेला. मग मी मंदिरातील लोकांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेला रिक्षाने उपनगरातील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नेले. त्यानंतर त्यांच्या मुलाचा नंबर घेऊन त्याला माहिती दिली. त्याने ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथे दाखल केले,” असे डॉ. आरती ओरिया यांनी सांगितले.
रितू आहुजा यांचा मुलगा समीर आहुजा यांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. “संपूर्ण मुंबईत महापालिकेने रस्ते खोदून ठेवले आहेत. माझ्या आईला मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे. अशा स्थितीत त्यांना इतकं गंभीर फ्रॅक्चर होणं म्हणजे जबरदस्त दुर्लक्ष आहे, असे ते म्हणाले.
या रस्त्यावरच भक्ती वेदांत शाळा आहे, जिथे अनेक मुलं याच रस्त्यावरुन जातात. जर बॅरिकेड्स लहान मुलांच्या अंगावर पडले असते, तर मोठा अपघात घडला असता. ठेकेदाराने जबाबदारीने काम केले पाहिजे. बॅरिकेड्स पडू नयेत म्हणून त्यांच्या मागे वजनदार दगड ठेवणे आवश्यक आहे, असेही डॉ. ओरिया म्हणाल्या.
दरम्यान, अंबोली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, महापालिकेकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.