मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, वयोवृद्ध तसेच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यापैकी महिलांसाठी सुरु असणारी ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) नेहमीच चर्चेत असते. ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. तर आता लवकरच ही रक्कम वाढवून २१०० होणार असल्याची घोषणा देखील झाली आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळणाऱ्या काही महिलांना झटका बसणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थींमधील तब्बल ८ लाख महिलांना १५०० नव्हे तर फक्त ५०० रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Saif Ali Khan : ३० हजारासाठी केला सैफवर हल्ला! पोलिसांचा आरोपपत्रात खुलासा
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून ६ हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून देखील ६ हजार रुपये, अशा एकूण १२ हजार रुपयांचा वार्षिक लाभ काही महिलांना मिळतो. त्यामुळे अशा महिलांना दुहेरी लाभ टाळण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेतून (Ladki Bahin Yojana) मिळणाऱ्या रकमेची कपात करून ती फक्त ५०० रुपये करण्यात आली आहे. हा निर्णय एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आला असून, अनेक महिलांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे.
८ लाख लाडक्या बहिणींचा हप्ता कपात
सरकारच्या नियमानुसार, एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण मागील काही काळात अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले. या प्रकाराची सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे.
‘आर्थिक लाभाचा दुहेरी फायदा मिळू नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित महिलांना केवळ एकाच योजनेचा मुख्य लाभ घेता येणार असून, दुसऱ्या योजनेतील सहाय्य मर्यादित स्वरूपात मिळेल’ असे सरकारने स्पष्ट केले आहे.
कधी मिळणार एप्रिलचा हप्ता?
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत ९ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता सर्वांचे एप्रिल महिन्याच्ाय हप्त्याकडे लक्ष लागले असताना अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे ३० एप्रिल रोजी एप्रिलचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)