Thursday, April 17, 2025
HomeUncategorized'आता थांबायचं नाय' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : झी स्टुडिओज् नेहमीच प्रेक्षकांना , मनोरंजक, दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत. झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत . सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. संधी ही कशी आणि केव्हा चालून येईल हे सांगता येत नाही. मात्र, मिळालेल्या त्या संधीचं सोनं करणं, अतिशय महत्त्वाचे आहे.

परीक्षा म्हंटल कि पोटात गोळा येतो पण ह्या चित्रपटातल्या परीक्षेचे किस्से तुम्हाला कधी हसवतील कधी तर रडवतील पण जाताना नक्कीच काहीतरी देऊन जातील. त्यात मागे वाजणारे ‘भोलानाथ’चे लहान मुलांचे मोठ्यांसाठी असलेले गाणे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवणारे आहे. यावर्षी लहानांच्या सुट्टीत मोठ्यांची शाळा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार हे नक्की !

एक माणूस आपल्यातलं टॅलेंट ओळखून स्वप्न पाहायला लावतो, हिंमत देतो आणि एक ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवतो. आपल्या आयुष्यात असणाऱ्या या दोन्ही घटकांना हा चित्रपट तुम्हाला ओळखायला मदत करेल. आपल्या दैनंदिन जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी , यशासाठी झेप घेताना तुमच्या-आमच्या सारख्या एका सामान्य माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि हा प्रवास यशस्वी होतो का हे पाहण्यासाठी आपल्याला येत्या १ मे रोजी रुपेरी पडद्याला भेट द्यावी लागेल, कारण प्रत्येक मराठी कुटुंबाने बघायला हवा असा हा चित्रपट आहे.

या चित्रपटात उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार असून ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात भरत जाधव यांच्यासह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘आता थांबायचं नाय’च्या निमित्ताने शिवराज वायचळ याने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणतो, “ ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून आयुष्यातील संघर्ष व पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळेल. वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा आहे. हा माझा पहिलाच चित्रपट. त्यातही अशी टीम लाभल्याने नक्कीच याचे फळ चांगले असेल, अशी आशा आहे.

झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे. तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव प्रोड्यूसर आहेत. येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -