मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ ब्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्क्याचे (जेट्टी) काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्याला सुरुवातीपासून कुलाबावासियांनी विरोध केला असून तो दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी मागणी केली होती. आता त्याला शिवसेना (शिंदे गट) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात या प्रवासी संख्येंत आणखी वाढ होण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळाने वर्तविला होता.
ही बाब लक्षात घेत सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी अपोलो बंदर परिसरातील रेडिओ क्लबजवळ एक मोठा धक्का बांधण्याचा निर्णय २०२२ मध्ये घेतला होता. तो बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. त्यानुसार तेथे एकाचवेळी १० ठिकाणी २० बोटी उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. दरम्यान, कुलाबावासियांनी मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध दर्शवला.स्थानिक समस्यांचा विचार न करता या धक्क्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून रोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, त्याच परिसरातून बोटींची सततची ये-जा, प्रवाशांची गर्दी आणि धक्क्यावरील गोंधळ यामुळे परिसराचा ऐतिहासिक व पर्यावरणीय समतोल बिघडेल असे देवरा यांनी पत्रात अधोरेखित केले आहे. तसेच मुंबईतच अन्य ठिकाणी प्रवासी धक्का हलवता येईल.त्यासाठी शासनाने सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.