संगमनेर : संगमनेर शहरातून हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेल्या हनुमान रथाला रोखत धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार दि. ११ आणि शनिवार दि. १२ एप्रिल रोजी घडलेल्या या दोन्ही घटना प्रकरणी मंगळवार दि. १४ एप्रिलला रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कमलाकर विश्वनाथ भालेकर (वय ६२, धंदा निवृत्त, रा. चंद्रशेखर चौक, संगमनेर) हे श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष आहेत. यावर्षी ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९:०० वाजता हनुमान जयंती उत्सवात सलामीचे वादन सुरू असताना विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर (सर्व रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी भैरवनाथ ढोलताशा पथक आणून वाजवण्यास सुरुवात केली.
Maharashtra Politics : राज्यात राजकीय वादळाची नांदी; नव्या आघाडीच्या संकेताने खळबळ
त्यावेळी ॲड. गिरीश मेंद्रे यांनी त्यांना ही सलामी होऊ द्या, मग तुमचे वादन करा, असे सांगितल्यावर या सहा जणांनी वाद घालत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली व विनायक गरुडकर याने योगराज कुंदनसिंग परदेशी यांच्या पोटात लाथ मारली. तर सौरभ उमरजी याने चेतन तारे याच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अमोल क्षीरसागर याने कमलाकर भालेकर यांना अरेरावी करत उद्या सकाळी तुम्ही चौकातून रथ कसा काढतात तेच बघतो अशी धमकी दिली. तर आरोपी सोनू नालकर याने मारण्याची धमकी दिली. शेखर सोसे याने किशोर उर्फ शुभम चंद्रकांत लहामगे यांच्या डोक्यात फायटरने वार केला जो त्यांनी चुकवल्याने खांद्याला लागला. श्याम नालकर याने श्यामसुंदर रामेश्वर जोशी यांनाही धमकी दिली.
त्यानंतर शनिवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता हनुमान जयंतीनिमित्त रथाची मिरवणूक सुरू असताना विनायक गरुडकर, शुभम परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या व मयूर जाधव यांनी वाद्य आडवे लावून मिरवणूक थांबवली आणि लोकांच्या भावना दुखावल्या. तर राहुल नेहुलकर याने वाद्य वाजवू दिल्याशिवाय रथ पुढे जाऊ देणार नाही, असे म्हटल्यावर समिती सदस्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र विनायक गरुडकर आणि त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. तर मयूर जाधव याने ज्ञानेश्वर अविनाश थोरात यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता चंद्रशेखर चौकात मिरवणूक संपवून रथ परत आल्यानंतर एका अल्पवयीन मुलाने चेतन विलास तारे यांना गलोरीने मारून डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच समितीच्या विश्वस्तांना मारहाण करून धार्मिक उत्सवात विघ्न निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी कमलाकर विश्वनाथ भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमर्जी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, शाम मधुकर नालकर, सोनु गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयुर जाधव उर्फ पप्पु (पुर्ण नाव माहीत नाही), राहुल शशिकांत नेहुलकर व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३१७/२०२५ अन्वये बी. एन. एस. कलम ११९ (१), १८९ (२), १९१ (२), १९१ (३), ११८ (१), ११५, १२५ (अ), १२६ (२), ६१ (२), ३००, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.