तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्ष भक्कम पाय रोवून असताना भाजपाने अण्णा द्रमुक पक्षाशी युती केल्याचे जाहीर केले व आगामी विधानसभा निवडणूक अण्णा द्रमुकचे नेते एडप्पादी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली युती लढवणार असल्याची भाजपाने घोषणा केली. ही घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चेन्नईत जाऊन केली आणि स्टॅलिन सरकारचे आता दिवस भरले असा सज्जड इशारा दिला.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले. या अधिवेशनाच्या अखेरीस मोदी सरकारने मांडलेल्या वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभा व राज्यसभेत वादळी चर्चा झाली. या विधेयकाला विरोध करण्यासाठी भाजपा विरोधक एकवटले होते. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आदी विरोधी पक्षांनी केली. अण्णा द्रमुकने याच सुरात सूर मिसळला होता. एवढेच नव्हे तर वक्फ सुधारणा सरकारच्या विरोधात अण्णा द्रमुक पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत मतदानही केले. मग असे अचानक काय घडले की भाजपा व अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष एकदम जवळ आले? अमित शहा मुत्सद्दी राजकारणी आहेत, तसेच राजकीय कुटनीतीमध्ये ते चाणक्य म्हणून ओळखले जातात. जो राजकीय पक्ष संसदेत भाजपाला साथ देत नाही, ज्या राजकीय पक्षाने गेल्या निवडणुकीत भाजपाशी युती तोडली त्या अण्णा द्रमुकशी भाजपाने पुन्हा युती केली, त्या पक्षाला एनडीएमध्ये दाखल करून घेतले, या सर्व घटना एवढ्या झटपट घडल्या की त्याचे देशातील सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्य वाटले. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अण्णा द्रमुक पक्षाबरोबर घाईघाईने युती का करण्यात आली हे गूढ अनेकांना उलगडलेले नाही. यापूर्वी भाजपाने आपली ताकद वाढविण्यासाठी सर्व शक्ती पश्चिम बंगालमध्ये पणाला लावली होती, तसेच आता भाजपाने अण्णा द्रमुकची पुन्हा युती करून एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार चेन्नईच्या तख्तावरून खाली खेचण्याचा चंग बांधला आहे. तामिळनाडूत पक्ष विस्तारासाठी भाजपा गेली दहा-बारा वर्षे अटोकाट प्रयत्न करीत आहे. पण द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक अशा लढाईत भाजपाचे काही फावत नाही हे श्रेष्ठींना कळून चुकले आहे. स्टॅलिन हे करारी नेतृत्व आहे. ते मोदी सरकारपुढे झुकत नाहीत, भाजपापुढे नमत नाहीत आणि परंपरागत राजकीय शत्रू असलेल्या अण्णा द्रमुकला वाढू देत नाहीत. द्रमुकला सत्तेवरून हटवायचे असेल तर आपण दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे, याची जाणीव भाजपा व अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांना झाली आहे. म्हणूनच राजकीय अरिहार्यतेतून आगामी विधानसभा निवडणूक भाजपा-अण्णा द्रमुक यांची युती लढणार असल्याची घोषणा स्वत: अमित शहा यांनी चेन्नईत येऊन केली.
अण्णा द्रमुकशी युती करण्यात भाजपाचे मावळते प्रदेशाध्यक्ष अन्ना मलाई यांचा मोठा अडथळा होता. त्यांचा अण्णा द्रमुकशी युती करायला कठोर विरोध होता. स्वत: अन्ना मलाई हे लढाऊ नेतृत्व आहे. त्यांनी द्रमुक सरकारच्या विरोधात लढताना पक्षात जान आणली व पक्षाचा पाया भक्कम केला हे मान्य करावेच लागले. जिथे भाजपाला कोणी विचारत नाही, भाजपाची केडर नाही, अशा राज्यात भाजपाच्या मतांची टक्केवारी ३ वरून ११ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात अन्ना मलाई यांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच अन्ना मलाई यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे व त्यांना पदावरून दूर करणे हे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला कठीण होऊन बसले होते. अन्ना मलाई हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते तरुण आहेत. सन २०१९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली व भाजपात प्रवेश केला. आपल्या दमदार कामाने त्यांनी मोदी-शहांचेही मन जिंकले. त्यांच्या कामाची तडफ पाहूनच त्यांच्यावर तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी सत्तेवरील द्रमुक सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली. स्टॅलिन सरकारला सतत ते हैराण करू लागले. सन २०२६ मध्ये तामिळनाडूमध्ये होणारी विधानसभा निवडणूक अन्ना मलाई यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा लढवणार असे सर्वांना वाटले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत अन्ना मलाई हेच भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील अशीही चर्चा होत असे. राजकारणात दिसते तसे नसते याची प्रचिती सर्वांनाच आली. भाजपा श्रेष्ठींनी भाकरी फिरवली. अचानक अन्ना मलाई यांची प्रदेशाध्यक्षपदावरून पक्षाने उचलबांगडी केली. त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविल्याशिवाय द्रमुकशी युती होणार नाही, याची श्रेष्ठींना खात्री होती. म्हणून त्यांच्या जागी नयनार नागेंद्र यांची पक्षाने नेमणूक केली व लगेचच भाजपा-द्रमुक युती झाल्याची घोषणा केली. ६४ वर्षांच्या नयनार नागेंद्रन यांनी भाजपाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणून १२ एप्रिल रोजी सूत्रे हाती घेतली. नागेंद्रन हे मृदुभाषी व्यक्तिमत्त्व आहे. दक्षिणी तिरूनेलवेली मतदारसंघातून ते आमदार आहेत. अन्ना मलाईंसारखे ते आक्रमक नाहीत, मग पक्षाचा अजेंडा कसा राबवणार? अण्णा द्रमुकचे नेते जे म्हणतील ते मान्य करून युती भाजपाला युती चालवायची आहे. स्टॅलिन सरकारचा पराभव हा एकमेव अजेंडा भाजपा-अण्णा द्रमुक युतीपुढे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तामिळनाडू हे पाचवे मोठे राज्य आहे. भाजपाने कर्नाटकमध्ये जम बसवला, पण केरळ व तामिळनाडूत भाजपाला फारसा शिरकाव करता आला नाही, आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने अण्णा द्रमुकला पुन्हा बरोबर घेऊन पक्ष विस्ताराचा अजेंडा तयार केला आहे.
सन २०२४ ची लोकसभा निवडणूक भाजपाने स्वबळावर तामिळनाडूत लढवली होती. या निवडणुकीत भाजपाला ११ टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा एकही उमेदवार खासदार म्हणून निवडून आला नाही. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अन्ना मलाई हे सुद्धा पराभूत झाले. तामिळनाडूत पक्षाला मोठा आधार नाही व स्वबळावर निवडणूक लढणे हे फायद्याचे नाही हे भाजपा श्रेष्ठींच्या लक्षात आले.
पुन्हा जुन्या मित्रपक्षाला बरोबर घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असा विचार पक्षात प्रबळ होऊ लागला, त्यातूनच भाजपाची साथ सोडून गेलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला भाजपाने पुन्हा पायघड्या अंथरल्या. संसदेचे अधिवेशन संपल्यावर अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांबरोबर चर्चा केली आणि अमितभाईंनी चेन्नईला जाऊन भाजपा-अण्णा द्रमुक युतीची घोषणा केली.
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतील सर्व ३९ जागांवर द्रमुकचे खासदार विजयी झाले. द्रमुकला ४६.९ टक्के मते मिळाली. १९९१ पासून द्रमुकने मिळवलेल्या मतांमध्ये ही सर्वाधिक मते होती. २०२४ मध्ये भाजपाने तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ पैकी २३ जागा लढवल्या. पण सर्वत्र भाजपाचा पराभव झाला. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३.६ टक्के मते मिळाली होती, सन २०२४ मध्ये ५.५ टक्के, २००९ मध्ये २.३ टक्के, २००४ मध्ये ५.१ टक्के मते मिळाली होती. अण्णा द्रमुक व भाजपापेक्षा द्रमुकचा जनाधार मोठा आहे. पलानीस्वामीपेक्षा स्टॅलिन यांचा जनाधार मोठा आहे. पण त्यांना अँटी इनकबन्सीचा फटका बसण्याचीही शक्यता आहे. तामिळनाडूत भाजपाने अण्णा द्रमुकला महत्त्व देऊ केले आहे. दीड वर्षांच्या फारकतीनंतर भाजपा व अण्णा द्रमुक पुन्हा युती झाली आहे.
जयललिता यांनी जशी अभिनेत्री म्हणून मोठी लोकप्रियता संपादन केली होती तसेच सर्वात लोकप्रिय राजकीय नेता म्हणून त्यांनी यश संपादन केले. अम्मा म्हणून जनतेत परिचित असणाऱ्या जयललिता या अण्णा द्रमुकच्या शक्तिशाली सर्वेसर्वा नेत्या होत्या. मुख्यमंत्री होण्याअगोदर त्या तामिळनाडू विधानसभेत विरोध पक्षनेत्या होत्या. दि. २५ मार्च १९८९ ची घटना. त्या दिवशी विधानसभेत प्रचंड गोधळ, गदारोळ झाला. त्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार होता. पण विरोधी पक्षनेत्यांवर पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई केली, म्हणून अण्णा द्रमुकच्या आमदारांनी आरोप केले. एवढेच नव्हे तर आपला फोन टेप केला जातो, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेत्या जयललिता यांनी करताच द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक अशी सभागृहात तुंबळ जुंपली. धक्काबुक्की-ढकला ढकलीत जयललिता यांची कोणीतरी साडी ओढली. कोणीतरी त्यांचे केस ओढले. संसदीय लोकशाहीला काळिमा फासेल अशी घटना घडली. जयललिता खचल्या नाहीत, त्या खंबीरपणे म्हणाल्या – माझ्यासोबत आज जे घडले, त्याचे मी उत्तर अवश्य देईन. पुढच्या वेळी सभागृहात पाय ठेवीन तर मुख्यमंत्री म्हणूनच… जयललिता दोन वर्षांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनच सभागृहात परतल्या. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. सन १९९१ ते २०१६ या काळात त्या १४ वर्षांपेक्षा जास्त काळ म्हणजेच ५२३८ दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…