डॉ. सर्वेश सुहास सोमण
सध्या सुरू असलेल्या आयात शुल्क युद्धामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहेत. मागील आठवड्यात ट्रम्पने टेरीफ वाढीला काही महिन्यांसाठी स्थगिती दिली आणि याच्या परिणामी गुरुवारी पुन्हा एकदा मोठी वाढ झाली. सध्या अमेरिकेने चीनला मात्र या आयात शुल्कातून दिलासा दिलेला नाही. आता चीन आणि अमेरिका यामध्ये प्रामुख्याने हे आयात शुल्क युद्ध सुरू आहे.
मागील आठवड्यात यावर्षीचे पहिले पतधोरण गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले. या युद्धामुळे भारताचा विकास दर कायम रहावा म्हणून रिझर्व बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात केली. आर्थिक वर्ष २०२५-२६साठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के आहे. सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी बघता व्यापारी निर्यात घसरण्याची शक्यता आहे. जागतिक विकास दर घटला तर कच्च्या तेलाच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.
पुढील काळात आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अनिश्चततेमुळे उद्योगधंदे, घरगुती खर्च आणि गुंतवणुकीवर परिणाम होईल. व्यापार कमी झाल्याने जागतिक विकासावर परिणाम होईल. त्याचा थेट परिणाम देशी विकासावर देखील होईल. सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे देशाच्या मध्यवर्ती बँका देखील सावधगिरीने पावले टाकत आहेत.
पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची दिशा मंदीची असून २३,२०० ही महत्वाची विक्रीची पातळी असून २१८०० ही महत्वाची खरेदीची पातळी आहे. सध्या शेअर बाजारात होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील हालचाली बघता पुढील आठवड्यात देखील मोठी हालचाल होणे अपेक्षित आहे.
पुढील आठवड्यात निफ्टी २३,२०० ते २२००० एवढ्या मोठ्या रेंज मध्ये राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे व्यवहार करताना काळजीपूर्वक आणि वरील पातळ्या लक्षात ठेवूनच व्यवहार करणे अपेक्षित आहे. सध्या ट्रम्प यांनी जरी आयात शुल्काला स्थगिती दिली असली तरी ट्रम्पचे आत्तापर्यंतचे घेतलेले बिनभरवशाचे निर्णय बघता, आणि अमेरिका आणि चीन यांमधील सुरू असलेले व्यापार युद्ध बघता पुढील काळात देखील शेअर बाजारातील अनिश्चितता कायम राहील.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)