ठाकरे गटात वाद विकोपाला : दानवेच काड्या करत असल्याचा खैरेंचा घणाघात
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद अधिकच तीव्र होत चालले आहेत. औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पक्षातीलच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर थेट आरोप करत ठिणगी टाकली आहे. “दानवेच शिवसेनेत काड्या करत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्यामुळेच पक्ष सोडत आहेत!” असा थेट हल्लाबोल खैरेंनी केला आहे.
“दानवे मोठा झाल्यासारखा वागत आहे” – खैरेंचा घणाघात
चंद्रकात खैरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्याला खैरेंनी दांडी मारली होती. याविषयी विचारले असता खैरे म्हणाले की, कालच्या पक्षाच्या कार्यक्रमाबाबत मला कुणी सांगितलं नव्हतं. या मेळाव्याबाबत अंबादासनेही मला काहीही सांगितलं नाही. पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले, मी शिवसेनेत सुरुवातीपासून आहे. लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, पक्ष वाढवला. आणि आता हा अंबादास नंतर येतो आणि स्वतःला मोठा समजतो. मला पक्षाच्या कार्यक्रमाबाबत माहितीच दिली नाही गेली. मला कचरा समजताय का? मी उद्धव साहेबांकडे तक्रार करणार आहे.
“काड्या करणं मला जमत नाही, पण मला कोणी काढू शकत नाही”
खैरे यांचा रोख स्पष्ट होता. त्यांनी ठामपणे म्हटलं, “माझ्या पक्षासाठी मी काहीही करेल. मी स्वतंत्र आंदोलन उभारणार, ते माझ्या पक्षाचं आंदोलन असेल. दानवे सहभागी झाला तर ठीक, नाही तर नाही. पण हे ठाम आहे की अनेक शिवसैनिक दानवेमुळे नाराज आहेत.”
दानवे यांच्या भूमिकेवर संशय – फुटीला जबाबदार?
खैरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “या माणसामुळे अनेक जुने कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. काय केलं आहे दानवे यांनी आजपर्यंत? फक्त द्वेष, मत्सर आणि काड्या!”
ठाकरे गटासाठी ही अंतर्गत फूट चिंतेची बाब ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे संघर्ष उघडपणे समोर येणं पक्षासाठी प्रतिकूल ठरू शकतं. आता अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर काय देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.