डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. १८९१ मध्ये ते जन्मले आणि १९५६ मध्ये वारले, पण या मधल्या काळात त्यांनी जगाला प्रचंड काही दिले. त्यांनी भारताला संविधान दिले. आज त्या संविधानाच्या बळावर तर काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष उड्या मारत आहेत. पण आंबेडकर यांनी संविधानासारखी अद्भूत गोष्ट तर दिलीच, पण त्याशिवायही त्यांनी भारतावर एक उपकार केले आहेत. प्रत्येक भारतीयाने त्याचे कृतज्ञतापूर्व स्मरण केले पाहिजे. ती आहे ती म्हणजे त्यांनी देशाला मुस्लीम राष्ट्र होऊ दिले नाही. जेव्हा त्यांनी हिंदू म्हणून मरायचे नाही असे ठरवले तेव्हा अनेक धर्म त्यांच्या पुढे पदर पसरून तुम्ही आमचा धर्म स्वीकारा म्हणून स्वागतार्थ पायघड्या घातल्या होत्या. त्यात मुस्लीमही होते. पण बाबासाहेबांनी तसला अविचार केला नाही व बौद्ध धर्म स्वीकारला आणि देशाचे आज एक अनोखे रूप आपण पाहत आहोत. यामागे बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी आहे. बाबासाहेबांनी देशाला एक फार मोठी बाब दिली आहे ती म्हणजे या देशाची घटना. संविधानाच्या जोरावर आज जे राहुल गांधी आणि तमाम काँग्रेसजन उड्या मारत आहेत त्यांना बाबासाहेबांनी ही भेट दिली आहे. तिचा दुरुपयोग कसा केला हे आपण पाहातच आहोत. पण बाबासाहेबांनी या देशाला संविधान रूपी शस्त्र देऊन तमाम भारतीयांना फार मोठे साधन दिले आहे. बाबासाहेबांनी भारतावर अनेक प्रकारे उपकार केले आहेत त्यापैकी एक आहे ती म्हणजे त्यांनी जीवनभर वंचित आणि शोषितांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी संघर्ष केला. त्यांनी त्यासाठी समाजातील शोषित आणि वंचित अशा दलित समाजातील वर्गात जागृती केली आणि भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हिंदू म्हणून जन्मलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही हे वाक्य त्यांनी तंतोतंत पाळले आणि बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्यासमवेत त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यांच्यासमवेत तीन लाख ६५ हजार अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हिंदू धर्मात जात्यंधता आणि इतर अनेक दुर्गुण होते त्यामुळे बाबासाहेबांना धर्म बदलावा लागला पण त्यांचा धर्मपरिवर्तनाचा निर्णय १९३६ मध्येच झाला होता असे इतिहास सांगतो. दलितांच्या उत्थानात हिंदू असणे हा मोठा अडसर आहे असे त्यांचे मत होते. हिंदू धर्माची जातीयता आणि जातीची उतरंड त्यांना न पटणारी होती आणि त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना अन्य कोणताही धर्म स्वीकारावा वाटला नाही हे त्यांचे मोठेपण होते. आपण त्याच्याबद्दलल बोलताना त्यांचे हे मोठेपण कधीच मान्य करत नाही. त्यांचे बौद्ध धर्मात प्रवेश करणे ही हिंदूंची जातीव्यवस्था नाकारण्याची प्रतिक्रियात्मक आणि लाक्षणिक कृती होती आणि त्यांनी समानतेच्या प्रति असलेली कटिबद्धतेशी सुसंगत होती. त्यामुळे त्यांच्या या कृतीकडे केवळ धर्मपरिवर्तन म्हणून न पहाता हिंदू धर्मातील दोष काढून टाकण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. बाबासाहेबांनी लाखो दलितांच्या लेकरांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आणि एक प्रकारचे आत्मभान दिले असे म्हणावे लागेल. बाबासाहेब विद्वान तर होतेच. त्यांनी त्यांचे ग्रंथालय अद्ययावत अशा ग्रंथांनी सुसज्ज केले होते आणि त्यांचे परिशीलन त्यांनी आयुष्यभर केले. त्यांनी सतत समानतेसाठी आणि समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी काम केले त्याला तोड नाही. आज त्यांची गरज प्रकर्षाने जाणवते आहे कारण आज समाजात जातिभेद प्रचंड प्रमाणात फोफावला आहे आणि उच्चनीच भेद प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे आज तर बाबासाहेबांची गरज तर जास्तच जाणवते आहे.
बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन केवळ हौस किंवा लहर म्हणून केले नाही तर त्यामागे संयुक्तिक कारण, नैतिकता आणि न्याय ही तत्वे होती. याच तत्वांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले आणि संघर्ष केला. बाबासाहेबांनी समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ती भूमी आज परमपवित्र भूमी म्हणून महाडमध्ये गणली जाते. दलित समाजाच्या व्यक्तीना माणूस म्हणून दर्जा मिळवून देणे आणि त्यांचा आत्मसन्मान वाढवणे हे त्यांच्या या कार्याचा लसावि होता असे म्हणावे लागेल. आपल्या पुस्तकात अनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मात प्रवेश का केला यावर आजही चर्चा होत असतात. पण काही विद्वानांच्या मते त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही, तर त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण त्यांन त्यात यश आले नाही असे म्हणून ठेवले आहे. या महामानवाला वंदन करण्यामागे त्यांचे केवळ बौद्ध धर्म स्वीकारणे हेच एक कार्य नव्हते तर त्यांनी अनेक दिग्गज हिंदू नेत्यांशी चर्चाही केली होती. त्यात सावरकर होते तसेच टिळकांचा मुलगाही होता. त्यामागे बाबासाहेबांनी आकसाने बौद्ध धर्म स्वीकारला असे म्हणणे चूक आहे. त्यांनी राजकारण केले आणि पहिले ते देशाचे कायदामंत्री होते. त्यांनी समाजाचे प्रबोधन केले आणि हिंदू धर्मावर कोरडे ओढले. पण हिंदू धर्मामुळे त्यांचे कधीही समाधान झाले नाही आणि शेवटी त्यानी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेब आजही महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी जी शिकवण दिली आहे तिची आज गरज कधी नव्हे ती जास्त आहे. ६५ वर्षांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी दलितांना आत्मसन्मान दिला आणि त्यांना शिकले तरच त्यांचा टिकाव लागेल हे तत्त्व शिकवले. त्यानी राखीव मतदारसंघांचा आग्रह धरला आणि त्यासाठी महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात करारही झाला. पण काँग्रेसने तो करार उधळून लावला आणि काँग्रेसने कधीही दलिताना बरोबरचे स्थान दिले नाही. केवळ भाषा मात्र त्यांच्या कल्याणाची करायची आणि पंगतीत त्याचा अपमान करायचा हे शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. आपल्या ६५ वर्षांच्या काळात आभाळाएवढे कार्य करणाऱ्या बाबासाहेबांना त्रिवार वंदन.