मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावर (Main Line) बुधवार १६ एप्रिलपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या होणार आहेत. याआधी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत होत्या. वाढत्या उकाड्याची दखल घेत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत १४ ने वाढ करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण कॉरिडॉर, नेरुळ-उरण पोर्ट मार्ग यावरुन दररोज १८१० लोकल फेऱ्या होतात. यात वाढ केलेली नाही. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सामान्य लोकलच्या फेऱ्या १४ ने कमी करुन त्याऐवजी उकाडा असल्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची संख्या १४ ने वाढवली आहे. वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवार ते शनिवारपर्यंत असतील. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वातानुकूलितऐवजी सामान्य लोकल फेऱ्याच होतील.
सकाळी ७.३४ कल्याण-सीएसएमटी, सकाळी १०.४२ बदलापूर-सीएसएमटी, दुपारी १.२८ ठाणे-सीएसएमटी, दुपारी ३.३६ ठाणे-सीएसएमटी, सायंकाळी ५.४१ ठाणे-सीएसएमटी, रात्री ९.४९ ठाणे-सीएसएमटी, रात्री ११.०४ बदलापूर-ठाणे अशा मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील (अप) लोकल फेऱ्या आता वातानुकूलित अर्थात एसी लोकल फेऱ्या असतील. तसेच मुंबईहून जाणाऱ्या मार्गावरील (डाऊन) सकाळी ६.२६ विद्याविहार ते कल्याण, सकाळी ९.०९ सीएसएमटी ते बदलापूर, दुपारी १२.२४ सीएसएमटी ते ठाणे, दुपारी २.२९ सीएसएमटी-ठाणे, दुपारी ४.३८ सीएसएमटी ते ठाणे, सायंकाळी ६.४५ सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री ९.०८ सीएसएमटी ते बदलापूर या वातानुकूलित अर्थात एसी लोकल फेऱ्या असतील.