नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड
आजोबा देवाघरी गेले नि आजी मागे उरली.
आजोबा गेले त्या दिवसापासून एक कावळा खिडकीशी मुकाट बसे. काव काव न करता. आजीला वाटे ते आजोबांचे मृत्युपश्चात रूप आहे. आजी मग कावळ्याकडे बघत राही, मूकपणे. कावळाही हालत नसे. बच्चू आजीकडे बघत राही.
“का गं कावळा कावळा करतेस?”
“मला वेगळंच वाटतं रे बच्चू !”
“काय वाटतं आजी?”
“हे आलेत असं वाटतं.”
“हे म्हणजे आजोबा?”
“होय बच्चू.”
“माणसाचा मृत्यूनंतर पक्षी होतो का गं आजी?”
“अरे शरीर मृत्यूनंतर जळून जातं… पण आत्मा अविनाशी असतो बच्चू.”
“अविनाशी म्हणजे काय गं आजी?”
“म्हणजे नाश न पावणारा!”
“म्हणजे तोच जिवंत राहातो.”
“हो.”
“विनाश पावत नाही?”
“बरोबर.”
“म्हणजे ते आजोबाच असणार”
“वेगळे रूप धारण केलंय त्यांनी.”
“खरंच की गं.”
“उगाच का तासन् तास आपल्या खिडकीत बसेल काऊ?”
‘‘हो गं.’’
“बच्चूच्या आईच्या लक्षात ही गोष्ट आल्याशिवाय कशी राहील बरं?
एकदा रात्री बच्चू झोपल्यावर ती सासूबाईंना म्हणाली,
“बच्चू नादिष्ट झालाय हल्ली.”
“का गं ? काय केलं त्यानं?”
“अहो, तो कावळा येतो ना खिडकीत, त्या कावळ्याला आजोबा समजतो नि तासनतास खिडकीत बसून राहतो.”
“हो का?” सासूने नव्याने समजल्यागत केले.
“तुम्ही त्याला सामील आहात.” सून न घाबरता म्हणाली.
“अभ्यास करणं सोडलंय त्यानं. बरं नाही हे या वयात.”
“मी समजले सून उद्यापासून नो कावळा. मी माझ्या मनाला आवर घालीन हो.”
“हे नक्की ना?”
“नक्की. तू नि माझा मुलगा, तो कावळा पकडा नि दूर जंगलात नेऊन टाका.” सासू म्हणाली.
“हा उपाय जालीम आहे.” सून खूश झाली.
बच्चू शाळेत गेल्यावर ‘कावळा पकडा’ मोहीम नवऱ्यासोबत तिच्या सुनेनं आखली नि फत्ते केली. पिशवीत पाखरू अडकलं. आता दूर गाडीनं जाऊ, नि त्याला सोडून येऊ असा बेत तिनं नवऱ्याबरोबर केला नि अक्षरश: पार पाडला. शाळेतून बच्चू घरी आला. ‘कावळा कावळा’ करून थोडा वेळ रडला. मग आजीनं नवी गोष्ट सांगितली. बाबांनी चॉकलेट कँडी खायला दिली. आईनं बटाटेवडे दिले तशी बच्चूची कळी परत एकदा खुल्ली.
“कावळा कुठे गेला असेल गं आई?”
“पाखरू ते गेलं उडून दुसऱ्या रानी.” आई म्हणाली.
बच्चू आता अभ्यास करू लागला. कावळा पुराण संपलं, नि आई नि बाबा परत निश्चित झाले. पण आजी दु:खी झाली. तिचा जीव त्या पाखरात अडकला होता ना !
पण तुम्हाला एक ठाऊक आहे का?
पाखरं आपला मुक्काम ज्या ठिकाणी आहे तो मुक्काम कधी विसरत नाहीत.
आठ दिवस छान गेले बच्चूच्या आई नि बाबांचे.
बच्चू अभ्यास करू लागला होता, त्यामुळे घर शांत होते. आजी मात्र तासनतास खिडकीत बसून राही. कावळ्याची वाट बघत. जेवणखाण कमी झालं होतं तिचं. सून गप्प असे अन् एक दिवस आजी खूश दिसली.
“आज खुशीत दिसताय अगदी.”
“हो.”
“काय कारण खुशीचं?”
“आहे एक.”
“हे परत आले.” सासू खूश होऊन म्हणाली.
सून घाई घाईनं खिडकीशी गेली. कावळोबा मजेत खिडकीत बसले होते. एक डोळा वाकडा करून सुनेस बघत होते.