काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा – श्रद्धा बेलसरे खारकर
सिमेंटचे जंगल बनलेले महानगर. जिथे माणसालाच राहायला जागा नाही अशा ठिकाणी हिरवेगार जंगल निर्माण करणे ही कल्पना अगदी अशक्य वाटते ना? पण ही किमया साधली आहे असीम गोकर्ण यांनी. ‘फ्लॉरीकॅल्चर’मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने काही वेगळे करायचे ठरवले. पुण्यात शिकत असताना अनेक बंगल्यातल्या बागा बघितल्या. आपणही आता बागा तयार करू या आणि त्याही मोठ्या असे या महत्त्वाकांक्षी मुलीने ठरवले. त्याआधी शेती करायची तीही वेगळ्या पद्धतीने हे तिने ठरविले होतेच. सुदैवाने तिचा जोडीदार पंकजनेही तिला चांगली साथ दिली. वाडा तालुक्यात पेठ रांजणी येथे तिची वडिलोपार्जित थोडी शेती होती. पाच वर्षे त्या ठिकाणी राहून तिने अनेक प्रयोग केले. पण प्रकृतीच्या कारणावरून तिला मुंबईला यावे लागले.
तिने मुंबईत आल्यावर विविध वृत्तपत्रांत लिहायला सुरुवात केली. नव्या ओळखी-पाळखीतून तिला छोटी मोठी लँडस्केपिंगची कामे मिळू लागली. मुंबई महानगरपालिकेत एका वास्तुविशारदाबरोबर काम करताना तिच्या लक्षात आले की, सरकार सामाजिक वनीकरण आणि वनीकरणाच्या नावाने अनेक योजना राबवते. लाखो वृक्षांचे रोपण केले जाते पण शेवटी हाती काहीच लागत नाही. कारण या प्रकल्पासाठी केलेली झाडांची निवडच चुकीची होती. जिथे वनीकरण करायचे तिथली माती हवामान, पावसाचा अंदाज इत्यादी बघून झाडे लावावी लागतात. तसे होत नाहीच. उलट पुष्कळ वेळा सुबाभूळ, गुलमोहर अशी परदेशी पण भराभर वाढणारी झाडे लावली जातात. यांना फळे येत नाहीत. त्यावर पक्षी घरटे करत नाहीत. शिवाय अशा झाडांना काही वर्षे तरी नियमित पाणी द्यावेच लागते. हे नीट न झाल्याने ही झाडे फारशी वाढत, टिकत नाहीत.
असीमने मग अनेक मूलभूत बदल केले. आंबा, चिकू, काजू, नारळ, सुपारी, वड, जांभूळ ही झाडे लावली. त्यांना वर्षभरानंतर पाणी द्यावे लागत नाही. झाडे जमिनीतून स्वत: पाणी शोषून घेतात. लँडस्केपिंग करताना तिने महत्त्वाची गोष्ट केली की, त्या परिसरात फिरण्यासाठी सिमेंटचे रस्ते बांधणे टाळले. त्याऐवजी ज्या नैसर्गिक पायवाटा होत्या त्याच मातीच्याच उपयोगाने चांगल्या बांधून घेतल्या. रानात कधीही खाली पडलेला पालापाचोळा उचलायचा नसतो. तो तिथल्याच मातीत मुरू द्यायचा असतो. त्यातून खत तयार होते. छोटे-मोठे कीटक, किडेमुंग्या वस्तीला येतात आणि त्यांचे परस्परांवर अबलंबून असणारे सहजीवन सुरू होते. दोन झाडात थोडे अंतर ठेवल्यामुळे प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश मिळू शकतो आणि वाढ चांगली होते. एक दोन वर्षांतच झाडे फुलापानांनी बहरून येतात. पक्षी घरटी करू लागतात. पक्ष्यांच्या किलबिलाटाने जंगल नांदते होते. पुष्कळवेळा नवीन जंगल तयार करताना नर्सरीतून तयार झाडेही आणावी लागतात, त्याचाही ती छान उपयोग करते.
असीमला असे वाटते की, जंगलात एकाच प्रकारची, रंगाची, जातीची झाडी नसावी. त्यात रंगीबेरंगी फुले असावीत. म्हणून नवी मुंबई इथे तिने बकुळीचे वन केले. एका ठिकाणी बहावा लावलेला आहे, तर अनेक ठिकाणी रानजाई लावलेल्या आहेत. जारूळ, बुच, पारिजातक आणि गोकर्ण हे खासकरून अनेक ठिकाणी लावले आहेत. अशा जंगलात वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळ्या रंगाची फुले बहरावीत असा तिचा कल्पक प्रयत्न असतो. कश्मीरमध्ये सिटीझन्स पार्क तयार करण्यासाठी तिला एक ग्लोबल टेंडर मिळाले! त्या प्रकल्पात नाविण्य आणताना तिथे नुसती झाडेच नाही तर काश्मीरची संस्कृती दिसली पाहिजे असा तिने आग्रह धरला. तिथे वाहणाऱ्या ओहळांना तिने नदीचे स्वरूप दिले. काश्मिरी लोक सकाळी उठल्यावर कहावा आणि रोट खातात. त्यासाठी तिने तेच पदार्थ मिळणारा एक कॅफेही तिथे सुरू केला. दुर्दैवाने तिचे हे काम काही पूर्ण होऊ शकले नाही.
आजतागायत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, शिर्डी, पुणे, इत्यादी ठिकाणी असीमने छोटीमोठी जंगले तयार केली आहेत. इथे नक्षत्रवन, आयुर्वेद वन, हिलिंग फॉरेस्ट, संस्कृतीवन इत्यादी. पुराणात वाचलेल्या कथांमधून अनेक वृक्षांची नावे आपल्याला फक्त माहीत असतात पण आपण ती बघितलेली नसतात. श्रीकृष्णाच्या आवडीचा कदंब वृक्षही तिने अनेक ठिकाणी लावला आहे. या प्रत्येक झाडाजवळ त्यांची माहिती दिली आहे. आता तिला गोष्टी सांगणारी झाडे असा उपक्रम हाती घ्यायचा आहे. तिचे “सिक्रेट्स ऑफ युवर अर्बन बॅकयार्ड” नावाचे पुस्तक ८ मार्चला जागतिक महिला दिनी प्रकशित झाले आहे. तिला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाचे काम मिळाले. तिथे झाडे टिकत नाहीत. जी काही झाडे येतात त्यांनाही वणवा लागतो असे समजले. तिने तिथल्या खडकाची मातीची पाहणी केली. सुबाभूळ आणि विविध जातीचे गवत तिथे वाढले होते. ही झाडे आतून पोकळ आणि हलकी असतात. त्यामुळे त्यांना सहज आग लागू शकते. मग तिने तिथे दाट छाया देणारी झाडे लावली. अशा ठिकाणी छोटी रोपे लावून चालत नाहीत. कारण ती तगत नाहीत. किमान अडीच इंच जाड बुंधा असणारी झाडे लावावी लागतात. कारण काही कारणाने झाडांना पाणी मिळाले नाही तर त्यांच्या बुंध्यात त्यांना काही दिवस पुरेल असा खाऊ असतो. आता असीमच्या शास्त्रशुद्ध आणि कल्पक प्रयत्नामुळे शिवनेरीचा परिसर हिरवागार झाला आहे.
गोदावरी नदी आणि पवई लेकचे काम तिने केले आहे. जिथे एवढा मोठा जलनिधी आहे तिथे काही वेगळी दक्षता घ्यावी लागली का असे विचारल्यावर ती म्हणाली, ‘जिथे पाणी जास्त असते त्या ठिकाणी जास्त पाणी पिणारे वृक्ष लावावे लागतात. नाही तर इतर प्रकारची झाडे तिथे लगेच कुजून जातात. मला आवडणारी जंगली बदामाची झाडे मी इतर ठिकाणी लावते. पण पाण्याजवळ ती लावायची नसतात. कारण या झाडाची पानगळ फार होते तेव्हा ही पाने पाण्यात पडतात आणि या झाडांवर ‘भुऱ्या’ रोग पडतो. त्यामुळे पाणी दूषित होते.’
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असीमने फुलवलेली जंगले आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक जंगलात फळे देणारी, फुले येणारी, झाडे आहेत. छान मातीचे रस्ते आहेत. इथे मुले येतात, खेळतात. प्रसंगी झाडावरची फळे तोडतात. जिथे लहान मुलांचे पार्क असते तिथे असीम आवर्जून पेरूची झाडे लावते. ही झाडे मजबूत असतात. बुटकी असल्याने मुले त्यावर चढू शकतात. मुलांना पेरू आवडतात आणि पेरू वर्षभर येतात. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचा असीम मोठ्या आदराने उल्लेख करते. त्यांच्यासारख्या द्रष्ट्या अधिकाऱ्यामुळे मला चांगली कामे करता आली असे ती आवर्जून सांगते.
एकेकाळी दंडकारण्यासारख्या गर्द जंगलांचे सुख पाहिलेल्या महाराष्ट्राला पुन्हा पहिले वैभव प्राप्त करायचे असेल तर अशा अनेक असीम निर्माण झाल्या पाहिजेत. तिच्यासारखे शास्त्रशुद्ध आणि कल्पक प्रयोग केले तरच एकेका झाडाचे रक्षण करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या शिवरायांच्या या राज्यात फळाफुलांनी बहरलेली, जिवंत, नांदती, जंगले तयार होतील आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याची मधुर फळे चाखायला मिळतील.
[email protected]