स्नेहधारा – पूनम राणे
जनशक्तीला जाग आणणारा, त्याच्यात नवीन प्राण भरणारा, नेता, पुढारी, नायक जयजयकाराच्या नद्यांमधून वाहणारा, रयतेची चाकरी नाकारणारा, येसकरांची भाकरी नाकारणारा, केळीच्या आणि रमच्या चिखलात न रुतणारा, पाय पुसण्यावर न बसणारा, फुलपाखरासारखा उडणारा, प्रकाश पसरवणारा, शेतातून, गर्दीतून, लढ्यातून आमच्याबरोबर असतो. आम्हाला शोषणातून सोडवतो. तोच तो आमचा एकुलता एक… आमच्या रथाचा सारथी… असे वर्णन कवी नामदेव ढसाळ यांनी ज्यांचे केले ते भारतीय घटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ हा जन्मदिवस.
त्यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याला झाले. तर माध्यमिक शिक्षण मुंबईतील एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. समाजामध्ये जीवन जगत असताना त्यांनी छळवाद, अपमान, भेदाभेद, उपेक्षा तिरस्कार त्यांच्या वाट्याला आले. बैलगाडीत बसलेलं पोर महाराच आहे. हे समजताच गाडीतून त्यांना खाली उतरवले. हिंदू खानावळची दारे बंद केली. इतके मानभगाचे प्रसंग आले. तरीही कुठेही त्यांनी हार मानली नाही.
शिक्षण हे शोषणमुक्तीची पायवाट आहे. शिक्षणातून समाज परिवर्तन होईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता. याकरिता १९४६ साली मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व १९५९ औरंगाबादमध्ये मिलिंद विद्यालय सुरू केले.
“शिका व संघटित व्हा, संघर्ष करा,” या घोषवाक्याचे त्यांनी आपल्या आयुष्यात तंतोतंत पालन करून, एमएससी. पीएच.डी., पदवी धारण केली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठाच्या इमारतीसमोर त्यांचा पुतळा उभा करून त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर सिम्बॉल ऑफ नॉलेज, अर्थात, ‘ज्ञानाचे
प्रतीक’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. आम्हा भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
“विद्या, प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री या पंचतत्त्वाचा अवलंब करून विद्यार्थ्यांनी आपली पात्रता आणि योग्यता वाढवावी असे ते म्हणत. ज्ञान आणि जिज्ञासा त्यांच्या श्रेष्ठतेची प्रेरक शक्ती होती.
“वाचाल तर वाचाल” असे ते नेहमी म्हणत. ग्रंथावर त्यांचे विशेष प्रेम होते. जगामध्ये वैयक्तिक ग्रंथालय कोणाचे नसेल इतके ग्रंथ त्यांच्याकडे होते. मुंबईतील राजगृह या निवासस्थानी त्यांनी उभारलेले व्यक्तिगत ग्रंथालय आहे. वाचन हा त्याचा छंद होता. खाण्यापिण्यातून काटकसर केलेल्या पैशातून ते ग्रंथ खरेदी करत. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव होती. म्हणून ते म्हणत, ‘‘मला इंजिनियर हवेत, तसेच जास्तीत जास्त मला साहित्यिक हवेत. उदात्त जीवनमूल्य आणि सांस्कृतिक मूल्ये साहित्य प्रकारातून आविष्कृत होत असतात असा त्यांचा ठाम विश्वास होता.
ते उत्तम वक्ते, पत्रकार, लेखक होते. समाजातील अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम वृत्तपत्रातून होते. यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रं सुरू केली. त्यांचे अग्रलेख अभ्यासपूर्ण असत. अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी वर्णभेद, पाण्याचा प्रश्न काळाराम मंदिराचा प्रवेश, वर्णभेद, समाजरचना, विवाह, ब्राह्मण, लोकशाही, राष्ट्रनिष्ठ, राष्ट्रप्रेम, धर्मगुरू यावरील क्रांतिकारक विचार वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापुढे मांडले.
त्यांच्या असामान्य बुद्धीच्या आणि कामाचा व्यासंग यामुळे ते भारतीय घटनेच्या शिल्पकार झाले. तब्बल दोन वर्षे ११ महिने, १७ दिवस, अविश्रांत मेहनत घेऊन २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना सभागृहात मांडली. त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने घटनेला मंजूर दिली आणि २६ जानेवारी १९५० चा संविधानाचा मसुदा लागू करण्यात आला. असे हे महान घटनाकार ज्ञानोपासक, विचारवंत लेखक तज्ज्ञ, पत्रकार, समाजसुधारक यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले.