Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलप्रेेमळ राधाबाई

प्रेेमळ राधाबाई

कथा – रमेश तांबे

राधाबाईंचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय होता. गेली वीस-पंचवीस वर्षे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी त्या भाजीपाला विकायच्या. तीन-चार माणसं तिच्या मदतीला होती. कारण ग्राहकांची गर्दी खूप असायची. सकाळी ९ ते १ आणि संध्याकाळी ४ ते ८ अशा साधारण ८ तास त्या भाजीपाला घेऊन बसायच्या.

राधाबाई स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्या गिऱ्हाईकांशी अगदी प्रेमाने बोलत. लोकांसाठी थेट शेतातूनच भाज्या घेऊन यायच्या. त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी टेम्पोसुद्धा विकत घेतला होता. कमी किंमत, ताजी भाजी शिवाय भाज्यांची विविधता यामुळे त्यांचा व्यवसाय अगदी जोरात होता. आजूबाजूचे भाजीवाले राधाबाईंचा राग राग करायचे. पण राधाबाईंना त्याची फिकीर नसायची. इमाने इतबारे धंदा करावा, गिऱ्हाईकांना देवासमान मानावे, गरजूंना मदत करावी अशी साधी सरळ त्याची जीवन श्रद्धा होती.

पण एक दिवस असा उजाडला की, राधाबाईंचं व्यक्तिमत्त्व अगदी उजळून निघालं. सोन्यासारखं लखलखू लागलं. त्या दिवशी बरोबर ९ च्या सुमारास राधाबाई भाजीपाल्याच्या टोपल्या ओळीने मांडून, देवाची मनोभावे पूजा करून बसल्या. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. राधाबाईंचा माल झपाट्याने संपू लागला. तेवढ्यात त्यांचं लक्ष दूरवर उभ्या असलेल्या एका आठ-दहा वर्षांच्या मुलाकडे गेलं. गोरापान, स्वच्छ कपडे घातलेला मुलगा त्यांच्या नजरेस पडला. पण तेवढ्यात, “राधाबाई, भोपळा कसा दिला हो?” असा प्रश्न त्यांना गिऱ्हाईकाने विचारताच त्यांचं त्या मुलावरचे लक्ष उडालं. दुपारचा १ वाजत आला होता. तरी तो मुलगा हातात पिशवी घेऊन तिथेच उभा होता. राधाबाईंना कळेना की हा मुलगा इथे का उभा आहे? त्याला भाजी घ्यायची आहे का? की तो गर्दीत हरवला आहे? राधाबाईंच्या मनाची चलबिचल वाढली. त्या जागेवरून उठल्या आणि मुलाजवळ गेल्या.

राधाबाई त्या मुलाच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “काय रे बाळा, काय हवंय तुला? मी सकाळपासून पाहते आहे तू चार तास उभाच आहेस. हातात पिशवी आणली आहेस. चांगल्या घरातला दिसतोस, काय हवंय तुला? भाजी हवी आहे की घराचा पत्ता तुला आठवत नाहीये.” आता मात्र तो मुलगा घाबरला. तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. राधाबाईंनी अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, “बाळ घाबरू नकोस. बोल, काय हवंय तुला? त्या मुलाने भरल्या डोळ्यांनी राधाबाईंकडे पाहिले आणि म्हणाला, “काकू, तसं काही नाही. नाही विसरलो मी घरी जायला! खरं तर मला घरच नाही. कारण मी अनाथ आश्रमात राहतो. तिथे महिन्यातून एक दिवस प्रत्येकाला भाजी आणायला बाजारात पाठवतात. मीही तसाच आलो. पण आमच्या बाईंनी मला दिलेले पैसे माझ्या पिशवीतून आश्रमातच कुणीतरी चोरले. ती मुलं मला त्रास देण्यासाठी नेहमीच असं करतात. मी आमच्या बाईंना झालेला सर्व प्रकार सांगितला. पण त्या मलाच दोष देऊन मोकळ्या झाल्या. वर दम देत म्हणाल्या, “भाजी घेतल्याशिवाय आश्रमात परत यायचं नाही.” त्यामुळे मला भाजी कोण देणार? हा प्रश्न मला पडलाय.” आता भाजी न घेताच आश्रमात गेलो, तर बेदम मार मिळेल. अगदी दिवसभर उपाशीदेखील ठेवतील. आता मात्र तो ओक्साबोक्शी रडू लागला. राधाबाईंचेही डोळे भरून आले. त्यांनी त्याला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, “बाळ रडू नकोस. मी आहे ना, काकू नाही, आईच समज मला.” हे सारं बोलताना राधाबाई पदराने आपले डोळे पुसत होत्या.

मग राधाबाईंनी मुलाच्या हातातली पिशवी घेतली. त्याला जी भाजी हवी होती ती भाजी अगदी पिशवी भरून दिली. शिवाय इतरही काही भाज्या दुसऱ्या पिशवीत भरून घेतल्या अन् त्या मुलाच्या सोबत आश्रमात गेल्या. “इथून पुढे या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतेय” असं आश्वासन तिथल्या प्रमुखांना देऊन राधाबाई मोठ्या समाधानाने घरी परतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -