महाभारतातील मोतीकण – भालचंद्र ठोंबरे
प्रत्येक युगाच्या शेवटी त्या कालावधीत समाजात धार्मिक शक्ती क्षीण होत जातात व समाज श्रद्धाहीन होतो. आयुष्यमानही कमी होते. हे पाहून सर्व जगाचे हित व्हावे असे श्री व्यासांना वाटले. तसेच अग्निष्टहोमादी वेदोक्त कार्याने लोकांचे हृ दय शुद्ध होते, म्हणून व्यासांनी वेदांचे ऋग्वेद, अथर्वेद, सामवेद व यजुर्वेद असे चार भाग केले. सर्वांना वेद यावेत म्हणून त्याचे अनेक भाग पाडले. सर्वसामान्य जनांच्या वागणुकीतून शास्त्राच्या आचरणात चुका होतील म्हणून त्यांचेही भले व्हावे म्हणून त्यांच्यासाठी महाभारताच्या निमित्ताने वेदांचाही अर्थ विषद केला; परंतु एवढे करूनही व्यासांचे समाधान झाले नाही.
अशा विचारात व्यास असताना त्या ठिकाणी नारदांचे आगमन झाले. ब्रह्मर्षी नारदांना पाहून व्यासांनी नारदांना आपल्या अशांत मनाला शांत करण्याचा उपाय विचारला. तसेच कालाच्या अंती सगळ्या स्मृती नष्ट होत असतांनाही आपल्या सर्व स्मृती कशा कायम राहिल्या ह्याची जिज्ञासापूर्ण विचारणा केली. तेव्हा नारदांनी अशांत मन शांत करण्यासाठी तसेच जगत कल्याणासाठी व सर्व जीवमात्रांना बंद मुक्त करण्यासाठी श्री व्यासांना भगवंताच्या लिलेचे वर्णन करण्यास सांगितले. तसेच नारदाने आपले पूर्वचरित्र कथन केले.
नारदाचे पूर्वचरित्र :
या कल्पा पूर्वीच्या जन्मात नारद एका ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होता. एके दिवशी चतूर्मासात त्यांच्याकडे काही योगीजन आले. नारदांनी त्यांची मनापासून सेवा केली. तसेच त्यांच्या परवानगीने त्यांच्या पात्रातील उष्टे अन्न नारद खात असत. योग्यांच्या सानिध्यात दररोज भगवंताच्या लीलेच्या कथा ऐकल्याने नारदांना भगवंताविषयी प्रेम वाटू लागले. त्यांच्यातील रजोगुण, तमोगुण नाहीसे होऊन त्यांना भजन पूजनात गोडी वाटू लागली. त्यांच्या हृदयात भगवंताविषयी प्रीती व भक्ती उदय पावू लागली.
एके दिवशी नारदांची माता रात्रीच्या वेळी गाईचे दोहन करण्यासाठी जात असताना तिचा पाय सापावर पडला व सर्पदंश होऊन ती मरण पावली. ही भगवंताची इच्छा मानून नारद घराबाहेर पडून, उत्तरेकडे गेले. त्यांना मार्गात अनेक धनसंपन्न देश, भटक्या वस्त्या, विचित्र पर्वत, नद्या, सरोवरे, लागली. एका ठिकाणी नारद नदीत स्नान करून वृक्षाखाली ध्यानस्त बसले असता व भक्तीपूर्वक अंतकरणाने भगवंताचे ध्यान करू लागताच योग्यांनी वर्णन केल्याप्रमाणे भगवंताचे रूप यांच्या हृदयात प्रकट होऊ लागले. सर्व प्रकारच्या दुःखाचा नाश करणारे ते भगवंताचे रूप पाहतांना नारद आनंद सागरात बुडून गेले असता अचानकपणे ते रूप नाहीसे झाले.
त्यामुळे अस्वस्थ झालेले नारद त्या रूपाच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले. आपले मन हृदयात स्थिर करून नारद पुन्हा ते रूप पाहण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र तोच त्यांना एक धीर गंभीर आवाज ऐकू आला. हे बालक, तू माझे रूप या जीवनात पुन्हा पाहू शकणार नाही. तुझ्या मनात मला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण व्हावी या हेतूने मी माझे रूप क्षणभर तुला दाखविले. ज्यांच्या मनातील वासना पूर्णपणे नष्ट झाल्या अशानांच माझे दर्शन होते. तू आता हे शरीर त्यागून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याच्या दृढ निश्चयामुळे या सृष्टीचा प्रलय झाल्यावरही तुझ्या स्मृती कायम राहतील. तेव्हापासून भगवंताचे नाम कीर्तन करीत त्यांचे स्मरण नारद करू लागले. योग्य वेळी नारदांचा मृत्यू झाला. कल्पाच्या शेवटी जेव्हा सर्व सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून ब्रह्मदेव प्रलयाकालीन समुद्रात शयन करणाऱ्या विष्णूंच्या हृदयात शिरण्याचे ठरविले तेव्हा मीही त्यांच्या श्वासाबरोबर त्यांच्या शरीरात प्रवेश केला.
एक हजार चतुर्युगी संपल्यावर जेव्हा ब्रह्मदेव जागे होऊन त्यांच्यात सृष्टी निर्मितीची इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची वगैरे ऋषींसोबत मीही बाहेर पडलो. तेव्हापासून मी तीनही लोकात निर्धास्तपणे भ्रमण करीत असतो, भगवंत भजन त्यांच्या जीवनात अखंडपणे सुरू असते. जेव्हा मी त्याच्या लिलांचे वर्णन करतो तेव्हा ते माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात.
ज्यांचे चित्त नेहमी विषय भोगाच्या वासनेने आतुर असते त्यांच्या मोक्षासाठी भगवंताच्या लीलाचे वर्णन हे हा संसाररूपी सागर पार करण्याचे जहाज आहे. अशा प्रकारे आपल्या जन्म व साधनेचे रहस्य व्यासांना सांगून नारद विणा-वादन करीत प्रयाण करते झाले.