लहानशा गोष्टी, मोठा अर्थ – शिल्पा अष्टमकर
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. आता तर तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी ही राजमान्य व लोकमान्य राज्यभाषा झाल्याला आता पन्नास वर्षे होऊन गेली, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात, ‘‘महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राज्य मान्यतेचा सोनेरी मुकुट घालून उभी आहे; परंतु तिच्या अंगावरची वस्त्रे फाटकी आहेत. मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राज्यभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्षे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली.
“हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू
हिला बैसवू वैभवाच्या शिरी”
अशी या महाराष्ट्रातील शूरवीरांची आकांक्षा होती. त्यांच्याच अविरत प्रयत्नाने १९६० च्या १ मेच्या मुहूर्तावर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, पण दीडशे वर्षे ज्यांनी तुम्हा आम्हांला गुलाम बनवले त्या राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषेने आज या स्वतंत्र राज्यातील जनतेच्या मनावर मायावी जादू केली आहे. इंग्रजांच्या राज्यात कारभाराची भाषा झालेली इंग्रजी नोकऱ्या मिळविण्याचा सुलभ सोपान ठरली होती. आजही लोक आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, परदेशी जाण्याचा योग लवकर यावा अशा उद्देशाने इंग्रजी माध्यमांच्या शाळात दाखल करतात. मराठी शाळांमध्ये वर्ग कमी होत चालले आहेत. परिणामी शिक्षकांना नोकरीवरून कमी करण्याचा हुकूम येत आहे. असे नोकरीस मुकणारे शिक्षकही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. मग आपली मुले मराठीतील अभिजात वाङ्मयाचा आस्वाद घेऊ शकणार नाहीत. शिवाजी महाराज, तानाजी यांच्या मराठीतून वर्णिलेल्या पराक्रमाच्या कथा त्यांना कशा कळणार? अमरेंद्र गाडगीळ यांच्या “आईची देणगी’’ चा आस्वाद ती घेऊ शकणार नाहीत. साने गुरुजींच्या “गोड गोड गोष्टी” आणि “सुंदर पत्रे” त्यांना अपरिचित राहतील.
पु. ल. देशपांडे यांच्या लेखनातील विनोद त्यांना समजणार नाही. इंग्रजीचा आग्रह धरणाऱ्या लोकांचे म्हणणे असते की, इंग्रजीही ज्ञानभाषा आहे. जगात सर्वत्र ती व्यवहाराला उपयोगी ठरते. इंग्रजी भाषा अवश्य शिकावी, पण त्यासाठी मातृभाषेचा बळी देऊ नये. त्यासाठी सारे शिक्षण इंग्रजी माध्यमात शिकण्याची आवश्यकता नाही. जपानसारख्या प्रगत देशात त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्या मातृभाषेत चालते. आज जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे वैज्ञानिक व व्यापारी जात असतात. पण त्यांचे कोठेच अडत नाही.
हे सर्व पाहिले की, महाराष्ट्रात मराठीचे भवितव्य काय या विचाराने मन अस्वस्थ होते. मराठीचे शुद्ध तरल स्वरूप चिरंतन करण्यासाठी दत्तो वामन पोतदारांनी सांगितलेला ‘‘मराठीचा कर्मयोग” सर्वांनी स्वीकारला पाहिजे मी कोठेही स्वाक्षरी करीन ती शुद्ध मराठीतच, असा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे.
दोन मराठी माणसे एकत्र आली, तर त्यांनी मराठीतच संवाद साधला पाहिजे. आपल्या शहरातील इतर भाषिकांनाही आपल्या मराठीच्या शुद्ध स्वरूपाची ओळख करून दिली पाहिजे. त्यासाठी इतर भाषांचा राग, द्वेष वा अपमान करण्याची गरज नाही.
मराठी भाषेतील गोडवा, तिची लवचिकता, तिचं साैंदर्य आणि भावना व्यक्त करण्याची ताकद या गोष्टींमुळे आपण तिचा अभिमान बाळगावा. “माझी मराठी” ही केवळ भाषा नसून ती आपल्या ओळखीचाच भाग आहे.
आजच्या काळात मराठी भाषा टिकवण्यासाठी आपल्या हातात असंख्य साधनं आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, मराठी चित्रपट, पुस्तके. तसेच आपण स्वत: मराठीतून संवाद साधून, मराठी पुस्तके वाचून आणि मुलांना मराठीची गोडी लावून भाषेचं रक्षण करू शकतो.
फक्त अमृतालाही पैजेत जिंकणाऱ्या आपल्या मातृभाषेचा, मराठी भाषेचा विसर कधीही पडू देऊ नये.
राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा !’- या ओळींप्रमाणेच, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा असलेली मराठी भाषा ही आपल्या अस्मितेची ओळख आहे. ही केवळ संवादाची साधनाच नाही, तर ती आपल्या इतिहासाची, साहित्याची आणि संस्कृतीची साक्ष आहे.
मराठी ही आपल्या मुळाशी जोडणारी भाषा आहे. तिला केवळ वापरणं नव्हे, तर जपणं, वाढवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. चला तर मग, अभिमानाने म्हणूया – “माझी मराठी, माझा अभिमान’’