हलकं-फुलकं – राजश्री वटे
अरे, हे तर त्या नटसम्राट सारखं झालं म्हणायचं…
‘‘ घर देता का घर…’’
अगदी तसंच “कान देता का कान…’’!
खरंच, हल्ली असंच झालंय हो, कोणाला कोणाचं ‘काहीही’ ऐकायला वेळच नसतो… किती माणूस धावतोय नुसता… कशासाठी?… कोणासाठी?… हे सगळे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत… याची उत्तरे स्वतःला सुद्धा माहीत नसतात… कित्येक प्रश्न उत्तर नसलेले, मनाशी दंगा करत असतात… मग कधीतरी वाटतं कोणाशी तरी बोलावं… काही मार्ग सापडतो का… पण…
हा पण आडवा येतो…
कारण ‘‘कान’’ देणारं कोणी असतं का?
“अश्रूंनी डबडबलेले डोळे पाहून समजतंय मला… तुला काहीतरी बोलायचं आहे… नक्कीच! तुला माझ्या खांद्याच्या आधाराची गरज नक्कीच नाही… मग फक्त कोणीतरी ऐकणारं हवं आहे… बोल, तुझ्या मनातलं…!
किती समजूतदारपणा आहे यात… कसं ओळखलं समोरच्याच्या मनातलं! डोळ्यांतलं पाणी दिसल्यावर याला फक्त आधाराचीच गरज नाही आहे तर ऐकणाऱ्या कानांची गरज आहे. यावेळी उपदेश देणं, उगाचच होईल सगळं ठीक अशाची गरज नसते… तेव्हा हवा असतो ऐकणारा, ऐकून घेणारा ‘‘कान’’!
‘माझं जरा ऐक ना…’ अशी आर्त साद त्या डोळ्यांतून येत असते… पण खरंच, ते कोणी देऊ शकत का? योग्य वेळी कान दिल्यास तुटून गेलेल्या व्यक्तीला सावरू शकतो…! समोरच्याला बोलू देणं, त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे हे समजून घेणं हा पण एक समजूतदारपणाच आहे… समोरच्याचे ऐकल्याने जर त्याचे दुःख, अस्वस्थता दूर होणार असेल किंवा त्यातून बाहेर पडायला मदत होत असेल तर काय हरकत आहे कान द्यायला…
“ कोणी पुसणारं असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे’’… ही चंद्रशेखर गोखले यांची चारोळी इथे समर्पक आहे. तसंच…
‘‘कोणी ऐकणारं असेल तरच व्यक्त होण्याला अर्थ आहे’’…
आपलं दुःख, सल कोणाला तरी सांगतो आहे आणि समोरचा ते समजतो आहे, हा केवढा मोठा दिलासा आहे… एक व्यक्ती काय काय सहन करते आहे हे जेव्हा दुसरी व्यक्ती ऐकून, समजून घेते त्यावेळी म्हणजे दुःखावर फुंकर असते… ज्या ओझ्याखाली मन दबून गेलेलं असतं तो भार कमी झाल्यासारखा नक्कीच वाटतो!
आपलं दुःख काय आहे ते माझं मलाच माहीत असं जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते तेव्हा ते समोरच्याला कळावं असं वाटत असतं… तो काही मार्ग सांगेल किंवा मदत करेलच ही अपेक्षा नसते पण… हक्काचा कान मिळण्याची गरज नक्कीच असते त्यावेळी! ‘मी फक्त तुलाच सांगते’… असं आश्वासन घेऊनच व्यक्त होतात… म्हणजे ऐकणाऱ्याकडून खात्री केली जाते की या कानाची गोष्ट त्या कानाला कळू नये. पण खरंच असं घडतं का… फार कमी…
या कानाचा त्या कानाला कळू देऊ नये ही फार मोठी जबाबदारी असते ऐकणाऱ्याची!! सांगणारा व ऐकणारा यांच्यातील विश्वासाचा करार असतो हा!…
सांगणारा सांगतोच पण ऐकणाऱ्याची भूमिका अवघड व जोखमीची असते… कारण तो वचनबद्ध असतो कुठेही याची वाच्यता होणार नाही यासाठी… ते त्याला निभावायचं असतं आणि निभवावच लागणार असतं… हा असतो विश्वास!!
कधी सांगणाऱ्याच्या त्याच अनुभवातून ऐकणारा सुद्धा गेलेला असतो पण तरीही बोलणाऱ्याला शांतपणे ऐकून घेणे हा पण गुणच आहे. सोपं नाही हे की फक्त न बोलता कान देणं व वेळही देणं!… इथे आपण फक्त श्रोते आहोत याचं भान सतत ठेवणं गरजेचं आहे…
सांगणाऱ्याला प्रत्येक वेळी फार महत्त्वाचे सांगायचे असते असं काही नसतं पण… ते काहीतरी ऐकणारा कान हवा असतो…!!
म्हणून म्हणतात ना ‘‘भिंतीलाही कान असतात’’
याची दखल घ्यावी व कोणी काही सांगितलंच तर ते या कानाचं त्या कानाला कळू नये हा विश्वास कायम जपावा…’’
सांगणाऱ्याला हवा असतो कान…
अन्…
लिहिणाऱ्याला हवा असतो वाचक!!
पण मी काय सांगितलं ते मात्र कोणाला सांगू नका!!