ओंजळ – पल्लवी अष्टेकर
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद व आईचे नाव चिमणाबाई असे होते. पण जोतिबांची आई ते अवघे नऊ महिन्यांचे असताना मरण पावली; परंतु जोतिबांचा सांभाळ त्यांची आत्या म्हणजे गोविंदरावांची मावस बहीण सगुणा हिने केला. जोतिबा तिच्यावर मातेप्रमाणे प्रेम करत. त्याकाळात शिक्षण सार्वत्रिक नव्हते. शाळा नव्हत्या. पण ख्रिश्चन धर्मप्रचारक काही शाळा चालवित. वयाच्या ६ व्या वर्षी जोतिबांना शाळेत घालण्यात आले.
शाळेत जोतिबा एक बुद्धिमान, अभ्यासू मुलगा म्हणून चमकले. प्राथमिक शिक्षण संपल्यावर ते आपल्या वडिलांचा व्यवसाय पाहू लागले. शेतात जाऊन कष्ट करू लागले. जोतिबांच्या बागेजवळ गफार-बेगुनशीव-मेजर लेजिंट राहत. त्यांना जोतिबांच्या बुद्धिमत्तेची कल्पना होती, म्हणून त्यांनी आग्रह करून जोतिबांच्या वडिलांना इंग्रजी शाळेत आपल्या मुलाला पाठविण्याचा सल्ला दिला. वडिलांनी जोतिबाला स्काॅटिश मिशनच्या शाळेत इंग्रजी शिकण्यास पाठविले. दलित, गरीब, अस्पृश्य हिंदू बांधवांना, विशेषत: स्रियांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे जोतिबांचे ध्येय निश्चित झाले.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडूजी पाटील (नेवसे) यांच्या सावित्री या मुलीशी जोतिबांनी विवाह केला. सावित्री दिसायला सुंदर, बुद्धिमान व सुदृढ होत्या. लग्न झाले तेव्हा अंगठेबहाद्दर असणाऱ्या या महत्त्वाकांक्षी स्रीने स्वत: शिक्षण घेऊन १८४८ साली बुधवार पेठेत चिपळूणकर वाड्यात पहिली मुलींची शाळा उघडली. तेथे प्रथम जोतिबा शिकवित, पण नंतर ते काम सावित्रीबाईंनी स्वत:च्या अंगावर घेतले. जातीच्या लोकांनी चिथवल्यामुळे गोविंदरावांनी आपल्या मुलाला व सुनेला घराबाहेर काढले. निर्वाहासाठी जोतिबांनी रस्त्यांची, पुलांची कंत्राटी कामे घेण्याचे सुरू केले. शाळेतील मुलींची संख्या वाढत गेली तेव्हा आणखी दोन-तीन शाळा उघडण्यात आल्या. चार भिंतींच्या आतील शालेय शिक्षणासमवेत आणखी जास्तीचे कार्य स्रियांसाठी करणे जरूरीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
१८५२ मध्ये पुणे शहरातील भोकरवाडी गावात अस्पृश्यांसाठी त्यांनी मुलांची शाळा उघडली. त्यासाठी मुलांची मने वळवून त्यांना स्वच्छता व टापटीपपणा शिकवावा लागला. शाळेत अनेक जाती-जमातींची मुले शिकू लागली. तसेच त्या सुमारास त्यांनी ‘महिला सेवा मंडळाची’ स्थापना केली. जोतिबांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अध्यक्षा मिसेस इ. सी. जोन्स या होत्या. स्रियांच्या प्रगतीसाठी झटणारी ही पहिली संस्था होय. अखिल भारतीय पातळीवर महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या त्या सचिव होत्या.
समाजक्रांतीची सुरुवात एका स्रीने करावी म्हणजे एक धाडसच होते. अध्यापन क्षेत्रातील त्यांचे पहिले पाऊल म्हणजे समाजकार्याचा शुभारंभच होय. यासाठी कितीही हेटाळणी झाली तरी त्या डगमगल्या नाहीत. उलट त्या म्हणत, “माझ्या लहान-थोर बंधूंनो, मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकवण्याचे कार्य करीत आहे. मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर शेण अगर खडे फेकत नसून ही फुले उधळीत आहात. तुमचे हे कृत्य मला असे सुचवित आहे की, मी नेहमी अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत जावे. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो. ”
१८५३ मध्ये त्यांनी अविवाहित व परित्यक्ता माता झालेल्या बायकांसाठी आपल्या घरात अनाथाश्रम काढला. या तरुणींना सावित्रीबाई फुले यांनी मायेच्या ममतेने वाढविले. अशा निराश्रित स्रिया व त्यांची अनौरस मुले त्यांनी सांभाळली. सावित्रीबाई फुले यांच्यात एक कवियित्रीचे गुणही दिसून येतात. अभ्यासकांनी त्यांच्या कवितांची वर्गवारी साधारणपणे निसर्ग विषयक, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक, बोधपर, इतिहासविषयक आणि स्फुट कविता अशी केली आहे. त्यांच्या इतिहासविषयक कवितांमध्ये छत्रपती ताराबाई यांच्या शौर्याचा उल्लेख आहे. त्यांच्या एका कवितेची झलक-
ही एकच शूर रणगाजी छत्रपती ताराबाई,
शिवधनू प्रतापी माझी वीरांची रणदेवाई.
जयभवानी जयजयकार जय ताराराणी ललकार, तिज करी मी नमस्कार,
शूर देवीचा जयजयकार.
त्यांच्या कवितांमधून काव्य आशय, वैचारिक संपन्नता यांचे दर्शन घडते. जोतिबा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावकारशाही, नोकरशाही यातून समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. जोतिबांच्या जीवनाचे एकच सुत्र होते. ते म्हणतात,
मानवासाठी बहुधर्म कसे,
झाला का हो पिसे-ज्योति म्हणे.
मानवाचे धर्म नसावे अनेक,
निर्मिक (ईश्वर) तो एक – ज्योति म्हणे.
काशीबाई नावाच्या विधवेला एका तरुणाने फसविले. ती गरोदर राहिली, तेव्हा लोकनिंदेला घाबरून ती मुठा नदीच्या पाण्यात जीव देण्यास निघाली, तेव्हा जोतिबांनी तिला पाहून जीव देण्यापासून परावृत्त केले. तिला प्रेमाने आधार देऊन घरी आणले. सावित्रीबाईंनी तिला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळले. तिला मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी यशवंत ठेवले. स्वत:चा मुलगा म्हणून वाढविले व डाॅक्टर केले. त्याचा विवाह लावून दिला. म्हातारपणी जोतिबा पती-पत्नीचा सांभाळ याच मुलाने केला. १० मार्च १८९७ रोजी जोतिबांनी इहलोकीची यात्रा संपविली. त्यांच्या निधनाने ‘आपला एक मोठा आधार नाहीसा झाल्याने लोकांना परमावधीचे दु:खं झाले. सावित्रीबाईंनी जन्मभर जोतिबांना साथ दिली. पतीला वैचारिक व प्रत्यक्ष कार्यात सहकार्य करून अडचणी, छळ व टीका सहन करून जोतिबांचे कार्य फुलविले.
- सावित्रीबाईंनी श्रमकरी श्रोत्यांना नजरेसमोर ठेवून भाषणे केली. या भाषणांमधून त्यांनी समाजमनाची जडण-घडण करण्याचा प्रयत्न केला. ही भाषणे जोतिबा निवर्तल्यानंतरची असली तरी, त्यांच्या पूर्व आयुष्यातील वैचारिक अनुभवांच्या बैठकीवर पक्की आहे. सावित्रीबाईंची भाषणे सदाचरण, विद्यादान, उद्योग, व्यसन आणि कर्ज यावर आहेत.
- सदाचरण – परोपकार, सत्कार्य इ. चांगल्या वागणुकीने मनुष्यास सुख मिळते. या सदाचरणावर निष्ठा ठेवण्याचा त्यांचा अधिकार आहे. सदाचरणी व्यक्तीचे सदाचरण आत्मसात करण्याची सूचना त्यांनी कुटुंबे सुखी व संपन्न होण्यासाठी केली आहे.
- विद्यादान – अविद्यतेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दलित, बहुजनांना व सरकारला काही सूचना दिल्या.
- मानव कल्याणासाठी उद्योगांची नितांत आवश्यकता आहे. उद्योग हा मानवाचा मित्र असून, आळस हा माणसाचा शत्रू आहे.
- व्यसन – माणसाचे जीवन धुळीस मिळवण्यास व्यसने कारणीभूत असतात. व्यसनाचे दुष्परिणामही त्यांनी स्पष्ट केले आहेत.
- कर्ज – शहाण्याने कर्ज काढू नये ही शिकवण सावित्रीबाई देतात. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशा या असाधारण जोडीला कोटी-कोटी प्रणाम.