पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यातून रायगडकडे रवाना होण्यापूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रायगड दौऱ्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री पुण्यात आले. येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. भेटीत काय चर्चा झाली याची ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.
Devendra Fadnavis : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…’
पालकमंत्रिपदावरून तिढा कायम
रायगडचे पालकमंत्रिपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. मात्र येथे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे. अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. अमित शाह यांच्या आजच्या दौऱ्यात दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत आहे.
शाह यांच्या हस्तक्षेपाने तोडगा निघणार?
महायुती सरकार स्थापन होऊन चार ते पाच महिने उलटले तरी या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे शाह यांच्या हस्तक्षेपाने अखेर यावर तोडगा निघेल, अशी आशा आहे. आजच्या दौऱ्यात याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रायगड दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शाह यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.