Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सKutumb Kirtan : रंगभूमीवरचे ‘कुटुंब’ आणि बरेच काही...

Kutumb Kirtan : रंगभूमीवरचे ‘कुटुंब’ आणि बरेच काही…

राजरंग – राज चिंचणकर

निर्माते म्हणून प्रशांत दामले, लेखक म्हणून संकर्षण कऱ्हाडे, अभिनयाची बाजू सांभाळणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी वंदना गुप्ते यांच्यासह तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी व संकर्षण कऱ्हाडे हे कलावंत, दोन दशके प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असलेले दिग्दर्शक अमेय दक्षिणदास अशी सगळी टीम सध्या रंगभूमीवर ‘कुटुंब किर्रतन’ हे नाट्य घडवत आहे. आगळावेगळा असा विषय घेऊन रंगभूमीवर आलेले हे ‘कुटुंब’ सध्या रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. त्या निमित्ताने, या कुटुंबासोबत साधलेला
खास संवाद…

नाटकाची आवड असणे महत्त्वाचे…
प्रशांत दामले (निर्माते):

मी वंदना गुप्तेसोबत ‘श्री तशी सौ’ या नाटकात काम केले होते. पण मी निर्माता झाल्यानंतर तिच्यासोबत काम करायची संधी आता ‘कुटुंब किर्रतन’ या आमच्या नाटकाच्या निमित्ताने मिळाली आहे. संकर्षण तर खूप नशीबवान आहे, कारण त्याला वंदनासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळत आहे. या दोघांसह आमची कलाकारांची उत्तम टीम नाटकात काम करत आहे. त्यामुळे निर्माता म्हणून मला या नाटकाबद्दल कुठलीही धास्ती वाटत नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मंडळी काम करत आहेत. मुळात नाटकात काम करण्याची आवड असणे महत्त्वाचे असते. लेखक म्हणून संकर्षण आता छान लिहायला लागला आहे आणि वंदनाने त्याला शाबासकी दिली आहे. तिने एखाद्याला शाबासकी देणे खूप अवघड आहे. आमच्या या नाटकाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

खूपच छान अनुभव…
अमेय दक्षिणदास (दिग्दर्शक) :-

गेली २० वर्षे मी प्रायोगिक रंगभूमीवर काम करत आहे. स्पर्धा आणि स्पर्धाबाह्य असे बरेच उपक्रम मी केलेले आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरचा २० वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर व्यावसायिक असे हे माझे पहिलेच नाटक आहे. या पहिल्या नाटकासाठी प्रशांत दामले यांच्यासारखा दिग्गज निर्माता, वंदनाताईंसारखी सीनियर अभिनेत्री, संकर्षण, तन्वी, अमोल यांच्यासारखे यंग जनरेशनचे कलाकार अशी मंडळी आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आणि छान आहे. आम्हा सर्वांचे कष्ट फळाला येत आहेत आणि प्रेक्षकही नाटक एन्जॉय करत आहेत.

बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच…
संकर्षण कऱ्हाडे (लेखक व अभिनेता):-

आमचे हे नाटक म्हणजे ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ची निर्मिती आहे. मी लेखक आणि प्रशांत दामले निर्माते असलेले असे हे आमचे चौथे नाटक आहे. या नाटकाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. अमेय दक्षिणदास हे आमचे जे दिग्दर्शक आहेत, त्यांनी प्रायोगिक नाटकासाठी बरीच वर्षे काम केले आहे आणि त्यांचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. तन्वी मुंडले हिचे सुद्धा हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंदना गुप्ते यांच्याबरोबर मला पहिल्यांदाच काम करायला मिळत आहे. या नाटकातला चौथा कलाकार म्हणजे आमच्या ‘तू म्हणशील तसं!’ नाटकातला अमोल कुलकर्णी, अशी आम्हा सर्वांची छान भट्टी जमून आलेली आहे.

वेगळ्या धाटणीची भूमिका…
वंदना गुप्ते (ज्येष्ठ रंगकर्मी):-

या नाटकाच्या निमित्ताने मी प्रशांत दामलेच्या प्रॉडक्शनमध्ये काम करत आहे. प्रशांत दामले म्हणजे ‘ऑल इन वन’ निर्माता आहे, उत्तम अभिनेता आहे आणि त्याची निर्मिती पण छान असते. त्यामुळे त्याने या नाटकासाठी मला विचारले आणि मी साहजिकच तयार झाले. नवीन नाटकाकडे माझा ओढा होताच. त्यात चांगले कलाकार आणि चांगली भूमिका मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळे ! संकर्षण नाटकाचा लेखक आहे. त्याला लेखनाची आणि संवादांची उत्तम जाण आहे. यातली माझी भूमिकाही चांगली आहे. खूप दिवसांनंतर मला विनोदी प्रकारची भूमिका करायला मिळत आहे. लोकांना हसवणे खूप कठीण गोष्ट आहे, पण ते चॅलेंज मी पुन्हा एकदा स्वीकारले आहे.

अभिनयाचा क्लास…
तन्वी मुंडले (अभिनेत्री):-

‘कुटुंब किर्रतन’ हे आमचे नवीन नाटक रंगभूमीवर सुरू आहे आणि हे माझे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. प्रशांत दामले सरांची टीम आहे, उत्तम कलाकार आहेत, अमेय दक्षिणदास आमचे दिग्दर्शक आहेत. संकर्षण कऱ्हाडेने खूप छान नाटक लिहिलेले आहे आणि यात तो कामही करत आहे. वंदना गुप्ते या खूप कमाल अभिनेत्री आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करायला मिळत आहे. अशा मंडळींसोबत माझे पहिले नाटक आले आहे. या सर्व मंडळींबरोबर काम करणे म्हणजे अभिनयाचा रोजचा क्लास असल्यासारखे आहे.

उत्तम नाटकातले काम…
अमोल कुलकर्णी (अभिनेता):-

‘प्रशांत दामले फॅन फाउंडेशन’चे हे मी दुसरे नाटक करत आहे. संकर्षणने लिहिलेले असे हे माझे दुसरे नाटक आहे. त्याचा सहकलाकार म्हणूनही मी दुसरे नाटक करत आहे. वंदना गुप्ते यांच्याबरोबर मला पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करायला मिळत आहे. यातल्या एका मुलीच्या वडिलांची भूमिका मी करत आहे आणि यात अजून एक सरप्राईज आहे, जे प्रेक्षकांना नाटक पाहिल्यानंतर कळेल. उत्तम निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन असलेले आमचे हे नाटक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -