कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याची कळंबा कारागृहातून सुटका झाली. न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. शुक्रवारी सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर कोरटकरच्या सुटकेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली. कोल्हापूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अनामत रक्कम भरल्यानंतरच कळंबा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आले. दुपारी २.१५ मिनिटांनी कोरटकरला कारागृहातील अंडासेलमधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी यावेळी दिली. न्यायालयाने कोरटकरला बुधवारी जामीन मंजूर केला होता. जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती.
अटींचे पालन करण्याच्या सूचना
फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत. कोरटकर यांच्यावर दोन वेळा हल्ला झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण दिले होते.
घटनाक्रम
- २५ फेब्रुवारी : इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी. जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.
- २६ फेब्रुवारी : प्रशांत कोरडकर नागपूरमधून फरार.
- २७ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला आदर असल्याचा कोरटकरचा व्हीडिओ व्हायरल.
- ११ मार्च : न्यायालयाकडून कोरटकरला १७ मार्चपर्यंत दिलासा.
- १८ मार्च : कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
- २३ मार्च : पोलिसांनी तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक.