Friday, April 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यचला गावाला जाऊया...

चला गावाला जाऊया…

रवींद्र तांबे

गावामध्ये रोजगाराच्या संधी नसल्यामुळे गावातील नागरिक रोजीरोटीसाठी शहराकडे जातात. त्यामुळे आज ग्रामीण भागात गेल्यावर बरीच घरे बंद असताना दिसतात. कधी एकदा मुलांची परीक्षा संपते आणि गावी जाऊन येतो असे चाकरमान्यांना झाले आहे. कोकणात शहरात राहणाऱ्या व्यक्तीला चाकरमानी असे आदराने गावातील लोक म्हणतात. तसे गावी गेल्यावर गावची मंडळी त्यांचा पाहुणचार सुद्धा आदराने करतात. त्याप्रमाणे चाकरमानी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा त्याच्या हातात पानसुपारीसाठी दोनशे किंवा पाचशे रुपयाची करकरीत नोट ठेवायला विसरत नाहीत.

दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा संपली तरी अजून प्राथमिक, माध्यमिक आणि विविध पदव्यांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. मी लहान असताना माझ्या आयनल गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत वाडीतील मंडळी गावी आल्यावर मी त्यांना विचारायचो कोणत्या गाडीने आलाय? तेव्हा प्रभाकरची आई म्हणायची ‘रातराणी’ गाडीने…! मला प्रश्न पडायचा लालपरी म्हणतात. मग हिची ‘रातराणी’ गाडी कोणती, असा प्रश्न मला पडायचा. तेव्हा एक दिवस एका एसटी वाहकाला विचारले की ‘रातराणी’ हा गाडीचा प्रकार कोणता? तेव्हा त्यांनी मला सांगितले, ही दुसरी तिसरी गाडी नसून आपली सर्वांची लालपरी. ती रात्रीची येते म्हणून तिला चाकरमानी मंडळी ‘रातराणी’ म्हणतात. आता मात्र चाकरमानी लालपरीकडे प्रवासासाठी दुर्लक्ष करतात. आता सर्रास रेल्वेने येतात. काही चाकरमानी तर आपली स्वत:ची गाडी घेऊन येतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या लालपरी बऱ्याच ठिकाणी बंद करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही मंडळी लालपरीने येणे पसंत करतात. तेव्हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतूक करत असताना प्रवाशांच्या सेवेसाठी आणि चांगल्या प्रकारची सेवा देणे गरजेचे आहे. कारण बारा ते पंधरा तास प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांना चांगल्या प्रकारच्या सेवा देणे गरजेचे असते. त्यात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे चाकरमानी रेल्वेने जाणेच पसंत करतात. असे असले तरी लालपरीचा प्रवास अधिक सुखाचा असतो. प्रत्येक आगारात बस थांबते त्यामुळे प्रत्येक आगाराची रचना अशी असते हे त्यानिमित्ताने जवळून पाहता येते.

कितीही झाले तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येक जण आपल्या गावी जाऊन येतात. प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असते. त्यामुळे न चुकता गावी जातात. कोकणात तर मे महिना सोडा, सणासुदीच्या दिवसातही जर रजा मिळाली नाही तर लोक म्हणातात नोकरीचे काय होईल ते होईल, पुढे पाहू; परंतु गावी जाऊन येतात. इतका कोकणी माणूस श्रद्धाळू आहे. त्याचमुळे म्हटले जाते की, कोकणची माणसं साधी भोळी… काळजात त्यांच्या भरली शहाळी…!! उन्हाळा सुरू झाल्यावर त्यांना गावची आठवण येत आहे. जो तो जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. वर्षभरानंतर जिवाभावाची माणसे भेटणार आहेत. काहीजण तिकीट काढून एक एक दिवस कसा जातो हे मोजत आहेत.

लहान मुले तर आजी-आजोबांची आठवण काढत आहेत. आजोबांच्या मांडीवर कधी बसतो असे झाले आहे. तसेच गावच्या काकांची व वाडीतील मुले आपली वाट पाहत असतील. त्यांना केव्हा एकदा भेटतो आणि आपल्या गावच्या गोट्यात बांधलेल्या बैलांना बिस्कीट त्यांच्या तोंडासमोर केव्हा टाकतो असे मुलांना वाटत आहे. संध्याकाळी घरासमोरील वाफ्यात केव्हा एकदा वाडीतील मुलांना घेऊन क्रिकेट खेळतो असे झाले आहे. दुसऱ्या दिवशी गावच्या काकांबरोबर बैलांना घेऊन रानात जाणार. रानातील भरडावर फिरताना किंवा कुंभयाच्या झाडाखाली बसून समोरच्या डोंगरातील झाडे मोजताना तसेच आंब्याच्या झाडावर दगड गावच्या मुलांबरोबर मारताना एक वेगळीच मजा असते. काकाने करवंदे काढून कुंभयाच्या पानात द्यायची आणि आपण त्यावरती ताव मारायचा. नंतर संध्याकाळी चुलीवरचे काकूने केलेले जेवण जेवल्याने सकाळ केव्हा व्हायची हे समजत सुद्धा नाही.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काकू चुलीत काजू भाजून नंतर फोडून द्यायची. आठवड्याच्या बाजाराला जाऊन मासे आणून मासे तळलेले व माशांचा सार उत्तम करायची. मात्र तेवढीच गावची माणसे दररोज वेगवेगळ्या पद्धतीने पाहुणचार करत असतात. जसजसे परतीचे दिवस जवळ येतात तस तसे मन भरून येत असते. असे वाटते आता शहरात जाऊच नये. मात्र चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा गावची माणसे ढसढसा रडायला लागतात. कारण आपल्या मायेची माणसे असतात. गेली पंधरा दिवस एकत्र राहिलो. आता भेट वर्षान मग आजी म्हणायची, जगाचं वाचातं ता पुढच्या वर्षी भेतात. बंदिस्त घरात राहणारे चाकरमानी गावी आल्याने खऱ्या अर्थाने गावच्या माणसांमुळे मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. हा मोकळा श्वास केवळ आणि केवळ गावच्या रक्ताच्या नात्याने शक्य होत असते. तेव्हा उन्हाळा आल्यावर प्रत्येक चाकरमानी म्हणतात चला गावाला जाऊया..!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -