ज्ञानेश सावंत
पंजाबचे शेर पाचपैकी चार सामने गमावलेल्या हैदराबादशी त्यांच्या घरच्या मैदानावर लढत देणार आहे. सध्याची हैदराबादची अवस्था फार खराब आहे. ज्यांची २५० धावा करण्याची क्षमता होती ते सध्या १५० धावासाठी झगडताना दिसत आहेत. ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरीच क्लासेन असे एकास एक फलंदाज असूनसुद्धा हैदराबादवर अशी नामुष्की ओढवली आहे. गेल्या चार सामन्यामधील फलंदाजी बघितली, तर सलामीवीर अपयशी ठरले आहेत. तसेच मधल्या फळीतील फलंदाज धावा करत आहेत पण ज्या धावांची गरज आहे तेवढ्या धावा होत नाही आहे, तर गोलंदाजीमध्येही हा संघ भरकटलेला दिसतोय. एकंदरीत हा संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात अपयशी ठरल्यामुळे त्यांना सातत्याने पराभवाला तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे पंजाबचे शेर यावेळी मैदान चांगलेच गाजवत आहे.
गेल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एक राजस्थान विरुद्धचा सामना सोडला तर बाकीच्या तीन सामन्यात त्यांची कामगिरी चांगली झाली. तसेच राजस्थान विरुद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या तोफेसमोर त्यांच्या सलामीवीरांचा टिकाव लागला नाही. आजच्या सामन्यात ते आपली चूक सुधारतील अशी आशा आहे. गोलंदाजीमध्ये पंजाबसमोर एक मोठे आव्हान आहे, त्यांचा आघाडीचा फिरकीपट्टू युजवेंद्र चहल अपयशी ठरत आहे. गेल्या पाच सामन्यांत त्याच्या नावावर फक्त एका बळीची नोंद आहे. चला तर बघूया श्रेयस विरुद्ध पॅट कमीन्सचा सामना कसा रंगात येतो आहे.