नाशिक : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकाने पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. सीबीआय या प्रकरणी व्हॉटसॲप चॅट आणि आर्थिक व्यवहार यांच्यातील कनेक्शन तपासून कायदेशीर कारवाई करत आहे. नाशिक येथील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन आणि ओझर येथील लष्करी जवानांच्या वेतनासह विविध भत्त्यांसंदर्भातील देयके देण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयासह संलग्न कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासातून समोर आले आहे. संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालय, ओआरएस, एएसी या यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला आहे.
आतापर्यंतच्या तपासातून हाती आलेल्या माहितीआधारे नाशिकच्या आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या (एएसी) वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखापरीक्षक नवीन कुमार मिणा, अजय कुमार, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अनुप कुमार उर्फ अनुप पटेल, अश्विनी कुमार पांडेय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकच्या ओझर येथील ‘एओजीई’ कार्यालयातील लेखापरीक्षक विकास कुमार मीना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आर्टिलरी आणि आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील (ओआरएस) लेखापरीक्षक मोहित स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण तीन गुन्ह्यांमध्ये पाच अधिकारी आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम १७३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
ज्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांच्या घराची तसेच त्यांच्या मालमत्तांची आणि बँक खात्यांची तपासणी सुरू आहे. कागदपत्रांच्या छाननीची प्रक्रिया सुरू आहे.