आतापर्यंत १ लाख ३६ हजार ३७० एलईडी बनवले
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील पथदिव्यांच्या उभारणी करताना सोडियम व्हेपरच्या दिव्यांचे रुपांतर एलईडीचे दिव्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत संपूर्ण मुंबईत ९५ टक्के बसवण्यात आले आहे. मुंबईत १ लाख ४१ हजार १४१ पथदिव्यांच्या तुलनेत १ लाख ३६ हजार ३७० एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.
केंद्रीय धोरणात्मक निर्णयानुसार विदयुत ऊर्जा बचतीसाठीची योजना महाराष्ट्रात राबविण्याकरिता मा. केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीस महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा नवीन व नवीकरणीय मंत्री, मुंबई महानगरपालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक, आणि एनर्जी ईफिशियन्सी सर्विस लि. कंपनी यांना मुंबईतील दिवाबत्तीच्या खांबावर एल. ई. डी. पथदिवे बसविण्याची परवानगी दिली होती.
मुंबईत बेस्ट, अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लि. महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लिमिटेड या कंपन्या महानगरपालिकेसाठी कामे करतात. रस्त्यावर असलेले पारंपारिक (सोडियम व्हेपर) पथदिव्यांचे एल.ई. डी. पथदिव्यांमध्ये रूपांतर केल्यानंतर प्रस्तावित परिरक्षण दर महापालिकेला सादर करावा असा समावेश धोरणामध्ये होता. सद्यस्थितीत हा प्रकल्प सुमारे ९५ टक्के पूर्ण झाला आहे. तसेच ऊर्वरित काम हे विविध पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर असल्याने करता येत नाही. ही पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होताच ऊर्वरित काम पूर्ण करण्यात येईल असे महापालिकेच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बेस्टच्या हद्दीत एकूण ४२ हजार ४२१ पथदिवे असून त्यातील ४० हजार ७८४ पथदिव्यांचे एलईडीमध्ये रुपांतर झाले आहे, तर केवळ १६३७ पथदिव्यांचे एलईडीमध्ये रुपांतर झालेले नाही.
पश्चिम उपनगर ते पूर्व उपनगरांमध्ये अदानी इलेक्टीकच्यावतीने पथदिव्यांची देखभाल केली जात असून एकूण ८७ हजार ३४७ पथदिव्यांच्या तुलनेत ८४ हजार ४७० पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये झाले आहे तर महावितरणच्या ताब्यातील एकूण ११ हजार ३७७ पथदिव्यांपैंकी ११ हजार पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये करण्यात आलेले आहे असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावरील दिवाबत्तीचे पारंपारिक पथदिव्यांमधून एल.ई.डी. मध्ये रुपांतर केल्याने सरासरी विद्युत एनर्जी युनिटमध्ये 3७. ३५ टक्के आणि विजेच्या बिलामध्ये ३९.२४ टक्के एवढी बचत होत असल्याचे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.